Wednesday, 3 February 2021

म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील भाडेकरू / रहिवाशांकरिता अभय योजना
 
संपूर्ण थकीत भाडे विहित मुदतीत भरल्यास व्याजावर मिळणार सवलत
   
मुंबई, दि. ३ फेब्रुवारी, २०२१ :- कोरोना साथरोगाच्या पार्श्वभूमीवर लागू टाळेबंदीमुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर झालेल्या विपरीत परिणामांची बाब विचारात घेऊन म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील २१ हजार १४९ संक्रमण शिबिर गाळ्यांमधील भाडेकरू/ रहिवाशी यांच्यासाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत संक्रमण शिबिर गाळ्यांमधील भाडेकरू / रहिवाशी यांनी प्रलंबित/थकीत संपूर्ण भाडे विहित मुदतीत भरल्यास निव्वळ व्याजावर सवलत देण्याचा निर्णय मंडळामार्फत  घेण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती श्री. विनोद घोसाळकर यांनी आज दिली.
    यावेळी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. अरुण डोंगरे उपस्थित होते.       
    श्री. घोसाळकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे, माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, माननीय गृहनिर्माण मंत्री श्री. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार सदर योजना जाहीर करण्यात आली आहे. 
    सदर योजना दोन टप्प्यांत लागू केली जाणार असून ही योजना फेब्रुवारी-२०२१ व मार्च -२०२१ या दोन महिन्यांमध्ये लागू राहणार आहे.          
    पहिल्या टप्प्यांतर्गत संक्रमण शिबिर गाळ्यातील भाडेकरू/रहिवाशी यांनी दि. २८ फेब्रुवारी, २०२१ पर्यंत संपूर्ण थकीत भाडे रकमेची मुद्दल भरल्यास एकूण व्याजामध्ये ६० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
    योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत संक्रमण शिबिर गाळ्यातील भाडेकरू/रहिवाशी यांनी दि. ३१ मार्च, २०२१ पर्यंत संपूर्ण थकीत भाडे रकमेची मुद्दल भरल्यास एकूण व्याजामध्ये ४० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाणार आहे.
    मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबीर गाळ्यांमध्ये राहणाऱ्या भाडेकरू / रहिवाशी यांच्याकडे मोठ्या प्रमाणात भाडे व त्यावरील व्याजापोटी एकूण रु. १२९.९२ कोटी रक्कम थकीत आहे. या योजनेअंतर्गत जे भाडेकरू रहिवाशी संपूर्ण थकित रक्कम भरतील त्यांनाच ही सवलत लागू राहील.      

Friday, 22 January 2021

पारदर्शकता, विश्वासार्हता म्हणजे 'म्हाडा' - उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार  

म्हाडा पुणे मंडळातर्फे ५ हजार ६४७ सदनिका, ६८ भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात   

मुंबई, दि. २२ जानेवारी, २०२१ : पारदर्शक संगणकीय सोडत, सदनिकांचा उत्कृष्ट दर्जा, परवडणारा दर, विश्वासार्हता या वैशिष्ट्यांमुळे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सोडतींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुणे मंडळाच्या ५ हजार ६४७ सदनिकांच्या सोडतीसाठी ९२ हजार ३३५ अर्जदारांनी केलेले अर्ज हे त्याचेच प्रमाण आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी आज केले.
        पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक)  पुणे, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ५ हजार ६४७ सदनिका व राधानगरी (कोल्हापूर) येथील ६८ भूखंड विक्रीसाठी आज पुणे कॅन्टोन्मेंट येथील नेहरू मेमोरियल हॉल येथे संगणकीय सोडतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. पवार बोलत होते.
         यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. दत्तात्रय भरणे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती श्री. विनोद घोसाळकर, खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुण्याच्या उपमहापौर श्रीमती सरस्वती शेंडगे, म्हाडाचे मुख्य अभियंता -१ श्री. धीरजकुमार पंदिरकर आदी उपस्थित होते.
         श्री. अजित पवार पुढे म्हणाले की, म्हाडावर जनतेने दाखविलेला विश्वास हा कौतुकास्पद आहे. परवडणाऱ्या दरातील घरांची निकड या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या बाबीचा विचार करता भविष्यात म्हाडाने सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात जास्तीत जास्त सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे. समाजातील शेवटच्या घटकाला हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.  सर्वसामान्यांचे गृहस्वप्नपूर्तीचे काम म्हाडाच्या माध्यमातून सुरु आहे. म्हाडाने सदनिका वितरणासाठी कोणत्याही दलालाची, मध्यस्थाची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले.                   
         डॉ. नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या की, म्हाडावरील विश्वासामुळे अर्जदारांचा भरघोस प्रतिसाद सोडतीला मिळाला आहे. सोडतीमध्ये म्हाडाने विविध प्रवर्गासाठी आरक्षण ठेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे म्हाडावरील जबाबदारी आणखी वाढली असून ही जबाबदारी भविष्यातही म्हाडा निश्चित यशस्वीपणे पार पाडेल, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.  
         'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण (Live telecast) १ लाख ०८ हजार ३६० नागरिकांनी बघितले.                 
         सोडतीच्या कार्यक्रमात कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करण्यात आले.    
          प्रास्ताविक म्हाडाच्या पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. नितीन माने यांनी केले. आभार मिळकत व्यवस्थापक श्री. ठाकूर यांनी मानले.   













Monday, 18 January 2021

कोंकण मंडळाच्या सन २०१४, सन २०१६ व सन २०१८ च्या सोडतीतील
पात्र लाभार्थ्यांना विक्री किंमत भरण्याकरिता मुदतवाढ


मुंबई, दि. १८ जानेवारी, २०२१ :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू टाळेबंदीच्या कालावधीचे गांभीर्य लक्षात घेता म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्र  विकास मंडळाने सन २०१४, सन २०१६ व सन २०१८ च्या सदनिका सोडतीमधील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना सदनिकेची विक्री किंमत भरण्याकरिता दिनांक १५ मार्च, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.  
 
          कोरोना विषाणू प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीत लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सोडतीतील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा विहित वेळेत करता आलेला नव्हता. त्यामुळे सदर यशस्वी व पात्र लाभार्थ्यांकडून विक्री किंमत भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर यावर उपाययोजना म्हणून कोंकण मंडळातर्फे दिनांक १५ डिसेंबर, २०२० पर्यंत उपरोक्त सोडतीतील पात्र लाभार्थ्यांना सदनिकेची विक्री किंमत भरण्याकरिता बिनव्याजी मुदतवाढ देण्यात आली होती. या मुदतवाढीनंतरही काही पात्र लाभार्थ्यांना विक्री किंमतीचा भरणा करता आलेला नाही. त्यांच्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय कोंकण मंडळाने घेतला आहे.   
         
           म्हाडाने मुदतवाढ देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाबाबतची माहिती संबंधित बँकेलाही देण्यात आली असून संबंधित पात्र अर्जदारांनी त्यांना नेमून दिलेल्या संबंधित बँकेमध्ये विक्री किंमतीचा भरणा तात्काळ व विहित मुदतीत करावा. या मुदतवाढीनंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नसून म्हाडा सदनिका वितरणाच्या विहित नियमानुसार सदनिका विक्री किंमतीचा भरणा अर्जदारांना करावा लागणार आहे, असे कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. नितीन महाजन यांनी कळविले आहे.

Wednesday, 9 December 2020

म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे ५६४७ सदनिकांच्या
सोडतीसाठी अर्ज नोंदणीला उद्यापासून प्रारंभ


मुंबई, ०९ डिसेंबर,२०२० : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) पुणे, सोलापूर, कोल्हापूर व सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेतील ५ हजार ६४७ सदनिका व कोल्हापूर येथील ६८ भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी, अर्ज करणे या प्रक्रियेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती कक्षामध्ये गुरुवार, दिनांक १० डिसेंबर, २०२० रोजी दुपारी २.३० वाजता करण्यात येणार आहे.
    राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली व गृहनिर्माण राज्यमंत्री श्री. सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्री. एस. व्ही. आर. श्रीनिवासन, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल डिग्गीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. नितीन माने-पाटील यांनी दिली.     
    या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे येथे ५१४ सदनिका, तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे २९६ सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे ७७ सदनिका, सांगली येथे ७४ सदनिकांचा समावेश आहे. तसेच  म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या मोरवाडी पिंपरी (पुणे) येथील ८७ सदनिका, पिंपरी वाघिरे (पुणे) येथील ९९२ सदनिका तर सांगली येथील १२९ सदनिकांचा देखील या सोडतीत समावेश आहे. या सोडतीत अत्यल्प , अल्प , मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी सदनिका उपलब्ध आहेत.  तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील ६८ भूखंड देखील या सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध करवून देण्यात आले आहेत.
    दिनांक १० डिसेंबर, २०२० रोजी दुपारी ३ वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार असून  नोंदणीकृत अर्जदार सायंकाळी ६ वाजेपासून  ऑनलाईन अर्ज भरू शकतील. तसेच  ऑनलाईन अर्ज  नोंदणी दिनांक ११ जानेवारी, २०२१ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत करता येणार आहे.  दिनांक १२ जानेवारी, २०२१ रात्री ११.०० वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज  सादर करता येणार आहेत. दिनांक १३ जानेवारी, २०२१ रोजी रात्री ११.०० पर्यंत ऑनलाइन  अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे. तसेच दिनांक १३ जानेवारी, २०२१ रोजी संबंधित बँकांच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.       
    https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर सदनिका सोडतीबाबत माहिती पुस्तिका व अर्जाचा नमुना उपलब्ध राहील. दिनांक २२ जानेवारी, २०२१ रोजी प्राप्त अर्जाची सोडत कार्यक्रम पुणे मंडळाच्या कार्यालयात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात येणार आहे
    सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे. 

Tuesday, 1 December 2020

'म्हाडा'मध्ये संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन


मुंबई, दि. २६ नोव्हेंबर, २०२० :  भारताच्या घटना परिषदेने देशाची राज्यघटना दिनांक २६ नोव्हेंबर,  १९४९  रोजी देशाला अर्पण केली, या घटनेला ७१ वर्षे होत असल्याचे औचित्य साधत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आज संविधान दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल डिग्गीकर यांनी अधिकारी-कर्मचारी यांच्यासह  छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाला पुष्पांजली अर्पण करून संविधानाच्या उद्देशिकेच्या (Preamble) सामुहिक वाचनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.   
    भारतीय संविधान निर्मितीमधील संस्थापकांच्या योगदानाचा उचित सन्मान व्हावा म्हणून दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. जगातील सर्वोच्च ठरलेल्या भारताच्या संविधानाने देशातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान आणि समानतेचा हक्क दिला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर आधारित भारताच्या संविधानाने देशाला एकजूट ठेवले असून सर्वधर्म समभावाची जोपासना केली आहे. म्हणूनच भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी, याकरिता राज्यात दरवर्षी  संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले जाते. याच पार्श्वभूमीवर आज हा कार्यक्रम घेण्यात आला.
    श्री. अनिल डिग्गीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला म्हाडाचे मुख्य अभियंता-१ श्री. धीरजकुमार पंदिरकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. अरुण डोंगरे, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे, वित्त नियंत्रक श्री. विकास देसाई, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजनकार श्री. प्रवीण साळुंखे, 'म्हाडा'चे सचिव श्री. राजकुमार सागर, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्रीमती वैशाली गडपाले आदींसह म्हाडातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे प्रधान कार्यवाह श्री. एस. के. भंडारे यांनी केले.
    या कार्यक्रमावेळी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करण्यात आले, तसेच या कार्यक्रमात सुरक्षित अंतराचे पालन व्हावे, म्हणून 'म्हाडा'तील विविध विभागांमध्ये अधिकारी-कर्मचारी यांनी मुख्य कार्यक्रम स्थळी न येता त्यांच्या कार्यालयातच संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
    या प्रसंगी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी-कर्मचारी, सैन्य दलातील वीर जवान यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून म्हाडातील अधिकारी-कर्मचारी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.    

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे (Preamble) सामुहिक वाचन करताना 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल डिग्गीकर. समवेत मुख्य अभियंता-१ श्री. धीरजकुमार पंदिरकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी श्री.अरुण डोंगरे, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे, वित्त नियंत्रक श्री. विकास देसाई, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ श्री.प्रवीण साळुंखे, म्हाडाचे सचिव श्री. राजकुमार सागर, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्रीमती वैशाली गडपाले, म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे प्रधान कार्यवाह श्री. एस. के. भंडारे आदी. 
 

Wednesday, 27 February 2019

'म्हाडा'च्या नाशिक व औरंगाबाद मंडळ सदनिका सोडतीसाठी
ऑनलाईन अर्ज नोंदणीला 'म्हाडा'चे  अध्यक्ष श्री. उदय सामंत यांच्या हस्ते प्रारंभ
दोन्ही सोडतीकरिता उत्पन्न मर्यादा शिथिल; एकच युजर आय डी वापरून अर्जदाराला  एका पेक्षा जास्त सदनिकांसाठी अर्ज करता येणार  

मुंबई, दि. २७ फेब्रुवारी, २०१९ :- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या ११३३ व  व औरंगाबाद  गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या ९१७ सदनिकांच्या विक्री सोडतीसाठी अर्जदारांची नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरणे या प्रक्रियेचा शुभारंभ  'म्हाडा'चे माननीय अध्यक्ष श्री. उदय सामंत यांच्या  हस्ते आज करण्यात आला.
        नाशिक व औरंगाबाद मंडळाच्या कार्यालयात झालेल्या दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात हा शुभारंभ करण्यात आला.     
         नाशिक मंडळातर्फे सोडतीकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सॊडत दि. ०३ एप्रिल, २०१९  रोजी सकाळी दहा वाजता नाशिक मधील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात  काढण्यात येणार आहे. औरंगाबाद मंडळातर्फे सोडतीकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत दि. ०४ एप्रिल, २०१९  रोजी सकाळी दहा वाजता औरंगाबाद मधील तापडिया नाट्य मंदिर येथे काढण्यात येणार आहे. 
      श्री. सामंत म्हणाले की, म्हाडाची संगणकीय सोडत संपूर्णपणे पारदर्शक आहे. या सोडतीच्या  निमित्ताने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घेऊन गृहस्वप्नपूर्ती करावी. नाशिक व औरंगाबाद मंडळांतर्गत उभारण्यात आलेल्या सदनिकांच्या संगणकीय सोडतींकरिता माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. दोन्ही मंडळांच्या सोडतीकरिता उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आली असून एक युजर आय डी वापरून अर्जदार एका पेक्षा जास्त सदनिकांसाठी अर्ज करू शकतो, अशी माहितीही श्री. सामंत यांनी यावेळी दिली.   
     नाशिक मंडळाच्या सोडतीकरिता अर्जदारांची नोंदणी दि. २७ फेब्रुवारी, २०१९ दुपारी दोन वाजेपासून दि. २२ मार्च, २०१९ रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत केली जाणार असून याच कालावधीत नोंदणीकृत अर्जदारांना अर्ज सादर करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना दि. २७ फेब्रुवारी, २०१९  ते २४ मार्च, २०१९  या कालावधीत  एनईएफटी / आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे. दि. २७ फेब्रुवारी, २०१९ दुपारी २ वाजेपासून दि. २४ मार्च, २०१९ रात्री ११.५९ वाजेपर्यंत  डेबिट, क्रेडिट कार्ड तसेच इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे.
       नाशिक मंडळाच्या सोडतीत आडगाव-म्हसरूळ लिंक रोड (नाशिक), श्रीरामपूर (जि. अहमदनगर), पंचक (नाशिक), डॉ. वसंत पवार मेडिकल कॉलेजजवळ आडगाव (नाशिक), जी. डी. सावंत कॉलेज समोर, पाथर्डी शिवार (नाशिक), साईबाबा मंदिराजवळ, पाथर्डी शिवार (नाशिक), मखमलाबाद (नाशिक), चाळीसगाव रोड-धुळे  येथील सदनिकांचा समावेश आहे.                            
        औरंगाबाद मंडळाच्या सोडतीकरिता अर्जदारांची नोंदणी दि. २७ फेब्रुवारी, २०१९ दुपारी बारा वाजेपासून दि. २७ मार्च, २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत  केली जाणार आहे.  नोंदणीकृत अर्जदारांना  अर्ज सादर करण्यासाठी दि. २८ फेब्रुवारी, २०१९ रोजी दुपारी १२ वाजेपासून ते दि. २७ मार्च, २०१९ रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत मुदत देण्यात आली आहे.  नोंदणीकृत अर्जदारांना दि. २८ फेब्रुवारी, २०१९  ते २८ मार्च, २०१९ या कालावधीत एनईएफटी / आरटीजीएसद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे. दि. २८ फेब्रुवारी, २०१९ दुपारी १२ वाजेपासून दि. २७ मार्च, २०१९ रात्री ११.५९ वाजेपर्यंत  डेबिट, क्रेडिट कार्ड तसेच इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे.
         औरंगाबाद मंडळाच्या यंदाच्या सोडतीत देवळाई (औरंगाबाद),  एमआयडीसी पैठण,  एमआयडीसी वाळूज, तिसगाव येथील सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.     
        औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमाला औरंगाबादचे  महापौर श्री. नंदकुमार घोडेले, नाशिक/औरंगाबादचे मुख्य अधिकारी श्री. रमेश मिसाळ, वित्त नियंत्रक श्री. विकास देसाई, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी श्रीमती सविता बोडके आदींसह अधिकारी-कर्मचारी  उपस्थित होते.             
           सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजन्ट नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास नाशिक व औरंगाबाद मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन 'म्हाडा'तर्फे करण्यात आले आहे.       
--------
सोबत छायाचित्र पाठवीत आहोत.
औरंगाबाद  गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या ९१७ सदनिकांच्या विक्री सोडतीसाठी अर्जदारांची नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरणे या प्रक्रियेचा शुभारंभ करताना 'म्हाडा'चे माननीय अध्यक्ष श्री. उदय सामंत. समवेत औरंगाबादचे महापौर श्री. नंदकुमार घोडेले, श्री. अंबादास दानवे आदी.     

Saturday, 19 January 2019

कोंकण मंडळ सदनिका सोडत-२०१८

यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे सादर करण्यासाठी २८ जानेवारीपासून विशेष मोहीम


मुंबई, दि. १९ जानेवारी, २०१९ :- कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे सन २०१८ मध्ये काढण्यात आलेल्या ९०१८ सदनिका सोडतीतील यशस्वी अर्जदारांच्या पात्रता निश्चितीकरिता  आवश्यक पुरावे/कागदपत्रे सादर करण्यासाठी दि. २८ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.             वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनाच्या प्रांगणात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत  दररोज ५०० यशस्वी अर्जदारांची पात्रता निश्चित केली जाणार आहे. सोडतीतील संकेत क्रमांक २७४ विरार बोळींज (अल्प उत्पन्न गट) व संकेत क्रमांक २७६ बाळकूम ठाणे (मध्यम उत्पन्न गट) या योजनेतील सर्व यशस्वी अर्जदार तसेच टप्पा क्रमांक १ मध्ये राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत ज्या यशस्वी अर्जदारांना सहभाग घेता आला नाही अशा  अर्जदारांनी पात्रता निश्चित करण्यासाठी या विशेष मोहीमेत सहभागी होऊन आवश्यक कागदपत्रे / पुरावे सादर करावीत, असे आवाहन कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विजय लहाने यांनी केले आहे.                     या विशेष मोहिमेत सहभागी होण्यासाठी दि. २१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी २०१९ दरम्यान सकाळी ११ ते  दुपारी ३ वाजेपर्यंत वांद्रे पूर्व येथील म्हाडा कार्यालयातील मित्र कक्षातून टोकन दिले जाणार आहे. या टोकन क्रमांकाबरोबर अर्जदारास आवश्यक नमुना पत्रे व चेक लिस्ट दिली जाणार आहे. टोकन मिळवण्यासाठी अर्जदाराने सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जाची प्रत व स्वतःचे ओळखपत्र सोबत आणावे. पात्रतेसाठी आवश्यक नमुना पत्रे व चेक लिस्ट म्हाडाचे संकेतस्थळ https://mhada.gov.in वरही उपलब्ध करून देण्यात आली आहे. उपरोक्त कालावधीत अर्जदाराने पात्रतेसंबंधी लागणारे कागदपत्रे / पुरावे सादर न केल्यास भविष्यात यशस्वी अर्जदाराला मंडळातर्फे पुन्हा संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही व संबंधितांचा अर्ज रद्द करून नियमानुसार प्रतीक्षा यादी कार्यान्वित करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

Tuesday, 4 September 2018

कोंकण मंडळाच्या पात्रता तपासणी शिबिरास अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

 

८३० अर्जदारांना देकारपत्र प्रदान, १७००  अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी ;  ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ 


मुंबई, दि. ०४ सप्टेंबर, २०१८ :- म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात राबविण्यात येत असलेल्या पात्रता तपासणी शिबिरात गेल्या आठ दिवसांत सुमारे ८३० अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र देण्यात आले असून  एकूण १७००  अर्जदारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विजय लहाने यांनी आज दिली. 
     कोंकण मंडळातर्फे ९०१८ सदनिकांसाठी दि. २५ ऑगस्ट रोजी संगणकीय सोडत काढण्यात आली. या सोडतीतील यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करून त्यांची पात्रता निश्चिती करण्यासाठी कोंकण मंडळाने दि. २७.०८.२०१८ ते ०१.०९.२०१८ या कालावधीत शिबीर आयोजित केले. अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता या शिबिराला येत्या दि. ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या शिबिराच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत संकेत क्रमांक २७०, २७१ व एकात्मिक / विशेष नगर वसाहत प्रकल्पाअंतर्गतच्या संकेत क्रमांक २७२ व २७५ मधील यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करून तात्पुरते देकार पात्र देण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 
         सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासणाऱ्या म्हाडाने  माणुसकीचा आणखी एक अनोखा इतिहास रचला. संकेत क्रमांक २७२ कल्याण खोणी येथील अपंग प्रवर्गातून श्री. नामदेव नलावडे हे यशस्वी अर्जदार ठरले आहेत. शारीरिकदृष्ट्या अपंग असलेले श्री. नलावडे हे या पात्रता तपासणी शिबिरात कागदपत्रे घेऊन आल्याचे समजताच कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विजय लहाने यांनी त्यांच्या कागदपत्रांची तपासणी तत्परतेने करवून घेत त्यांची पात्रता निश्चिती केली.  श्री. लहाने यांनी स्वतः श्री. नलावडे यांना त्यांच्या वाहनापर्यंत जाऊन देकारपत्र दिले. या प्रकाराने श्री. नलावडे देखील भारावून गेले. 
        या शिबिरात पात्रता तपासणी करीता राज्यातील अनेक ठिकाणांवरून अर्जदार येत आहेत, अशा बाहेरगावाहून येणाऱ्या अर्जदारांना या शिबिरात प्राधान्य देण्यात येत आहे . किमान दोन ते तीन महिने कालावधी घेणारी पात्रता निश्चितीची ही प्रक्रिया केवळ काही दिवसातच पूर्ण होत आहे. म्हाडाच्या या तत्पर कार्यप्रणालीवर खुश होऊन अनेक अर्जदार त्यांना मिठाईचे पुडे देऊन आभार व्यक्त करत आहेत. अर्जदारांच्या सोयीकरीता हे शिबीर यापुढे ७ सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय कोंकण मंडळ प्रशासनाने घेतला असल्याचे श्री. लहाने यांनी सांगितले . 


Tuesday, 28 August 2018

म्हाडाच्या मुंबईतील ५६ वसाहतीतील गाळेधारकांची अभिहस्तांतरण प्रक्रिया होणार वेगवान-सुलभ    

सेवा अधिमूल्याच्या भरणेनंतर वाढीव सेवा आकारावरील व्याजाच्या रकमेच्या अदायगीस एक वर्षाची मुदत 

मुंबई, दि. २८ ऑगस्ट, २०१८ :- मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडाचा घटक) अखत्यारीतील मुंबईमधील ५६ वसाहतीतील गाळेधारकांची अभिहस्तांतरण प्रक्रियेस गती येण्याकरिता म्हाडातर्फे नवीन धोरण जाहीर करण्यात आले असून यानुसार इमारतीच्या मालकीचे सहकारी संस्थेकडे हस्तांतरण करतेवेळी संस्थेकडे १९९८ पूर्वीच्या सेवाआकाराच्या दाराची रक्कम दंडासह व सुधारित सेवा आकाराच्या दरातील मूळ रक्कम वसूल करुन सुधारित सेवा आकारावरील व्याजाची रक्कम एक वर्षात म्हाडाकडे भरण्याबाबत संस्थांकडून क्षतिपूर्ती बंधपत्र घेऊन ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करवून घेऊन अभिहस्तांतरण करता येईल , अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलिंद म्हैसकर यांनी जाहीर केलेल्या सुधारित परीपत्रकाद्वारे दिली आहे.   
       मिळकत व्यवस्थापक विनियम २१ मधील तरतुदीनुसार अभिहस्तांतरण झाल्यानंतर सेवा आकार व इतर देय रकमा संबंधित संस्थेकडे जसे बृहन्मुंबई महानगरपालिका, विदुयत मंडळाकडे परस्पर भरण्याची जबाबदारी संस्थेची राहील. तसेच अनधिकृत बांधकामांच्या अभिहस्तांतरणाबाबत म्हाडाच्या मूळ नकाशात दर्शविलेले क्षेत्रफळ ग्राह्य धरून अभिहस्तांतरण करता येईल व वाढीव बांधकामाबाबत स्वतंत्ररित्या कारवाई करण्यात येईल, असा निर्णय या परिपत्रकाद्वारे घेण्यात आला आहे. 
       अभिहस्तांतरण हे संस्थेच्या नावाने करावयाचे असते म्हणून म्हाडाचे मूळ गाळेधारक आणि म्हाडाकडून रीतसर परवानगी घेतलेले गाळेधारक यांच्या यादीनुसार संस्थेबरोबर अभिहस्तांतरण करण्यात येईल व संबंधित गृहनिर्माण संस्थेकडून सदरच्या गाळेधारकाच्या हस्तांतरणास, अभिहस्तांतरण झाल्यानंतर विहीत कार्यपद्धतीनुसार कागदपत्रांची पूर्तता व हस्तांतरण शुल्क भरून म्हाडाकडून परवानगी घेण्यात येईल असे प्रतिज्ञापत्र घेऊनच त्या गृहनिर्माण संस्थेचे अभिहस्तांतरण करण्यात येईल, अशी तरतूद या परिपत्रकात करण्यात अली आहे .  
         या नवीन धोरणामुळे  गाळेधारक व सहकारी गृहनिर्माण संस्थांना अभिहस्तांतरण करतेवेळी येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होईल व ही कार्यपद्धत अधिक सोपी, सुलभ, गतिमान होऊन अभिहस्तांतरणाला निश्चितच वेग मिळेल. मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील ५६ वसाहतीतील ३७०१ इमारतीत १,११,६५९ सदनिकाधारकांपैकी १,७३७ इमारती ४५,१६१ गाळेधारकांचे अभिहस्तांतरण झालेले असून, १,९६४ इमारतीतील ६६,४९८ गाळेधारकांचे अभिहस्तांतरण व्हावयाचे आहे. 

      

Thursday, 23 August 2018

म्हाडा सदनिका सोडत - २०१८

कोंकण मंडळाच्या ९०१८ सदनिकांसाठी ५५३२४ अर्ज प्राप्त

२५ ऑगस्ट रोजी सोडत ; अर्जदारांच्या सोयीसाठी वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण       


मुंबई, दि. २३ ऑगस्ट, २०१८ :- म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ९०१८  परवडणाऱ्या सदनिकांच्या विक्रमी ऑनलाईन सोडतीकरीता ५५,३२४ अर्जांचा यशस्वी प्रतिसाद मिळाला असून या अर्जदारांना सदनिका वितरणाकरिता शनिवार, दि. २५ ऑगस्ट, २०१८ रोजी वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात सकाळी १० वाजता संगणकिय सॊडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विजय लहाने यांनी आज दिली.  
       माननीय गृहनिर्माण मंत्री श्री. प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणारी ही सोडत मुंबई उपनगरचे माननीय पालकमंत्री तथा राज्याचे शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून  माननीय गृहनिर्माण राज्यमंत्री श्री. रविंद्र वायकर, माननीय खासदार श्रीमती पूनम महाजन, माननीय आमदार श्रीमती तृप्ती सावंत, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. संजय कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलिंद म्हैसकर उपस्थित राहणार आहेत.
      या सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगद्वारे करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच आपला निकाल जाणून घेता येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही  "वेबकास्टिंग" तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच म्हाडा मुख्यालयाच्या आवारातील मोकळ्या पटांगणात अर्जदारांना निकाल पाहता येण्यासाठी मंडप उभारण्यात येणार असून भवनात होणाऱ्या संगणकीय सोडतीचे थेट प्रक्षेपण पाहता यावे याकरिता एलईडी स्क्रीन देखील लावण्यात येणार आहेत. 
       यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी मीरा रोड, बाळकूम ठाणे, मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील ५१८ सदनिका व प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत  शिरढोण (ता. कल्याण), खोणी (ता. कल्याण) येथील ३९३७ अशा एकूण ४,४५५ सदनिकांचा समावेश आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता मीरा रोड, कावेसर ठाणे, वेंगुर्ला सिंधुदुर्ग, विरार बोळींज, खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील ४३४१ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता बाळकूम (ठाणे), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग),  मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी), विरार बोळींज येथील एकूण २१५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता वेंगुर्ला (सिंधुदुर्ग),  मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी) येथील एकूण ७ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.              
       मंडळातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे या सोडतीमध्ये यशस्वी अर्जदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी म्हाडा मुख्यालयात दि. २७ ऑगस्ट २०१८ ते ०१ सप्टेंबर २०१८ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या   योजना संकेत क्रमांकामधील २७०, २७१, २७२ व २७५ विजेत्यांनी कागदपत्रांसह हजर रहावे, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे. 
     सोडतीमधील विजेत्या तसेच प्रतिक्षाधीन अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in  या वेबसाईटवर दि. २५ ऑगस्ट, २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे, याची संबंधित अर्जदारांनी नोंद घ्यावी. 

Tuesday, 7 August 2018

कोंकण मंडळाच्या सदनिका  सोडतीला मुदतवाढ      

२५ ऑगस्ट रोजी संगणकीय सोडत ; ऑनलाईन अनामत रक्कम भरण्यासाठी १८ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत          

मुंबई, दि. ०७ ऑगस्ट, २०१८ :-  कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे  (म्हाडाचा घटक ) नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ९०१८ सदनिकांच्या विक्रमी सोडतीकरिता लोकाग्रहास्तव आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून नागरिक दि. १८ ऑगस्ट, २०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. शनिवार, दि. २५ ऑगस्ट, २०१८ रोजी वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात सकाळी १० वाजता संगणकिय सॊडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विजय लहाने यांनी आज दिली.                                    
    नवीन वेळापत्रकानुसार अर्जदार दि. १६ ऑगस्ट, २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत  नोंदणी करू शकतात . नोंदणीकृत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता अंतिम मुदत दि. १८ ऑगस्ट ,२०१८ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे. तसेच  ऑनलाईन अनामत रक्कम  भरण्याची अंतिम मुदत दि. १८ ऑगस्ट, २०१८ रोजी रात्री ११. ५९ वाजेपर्यंत असणार आहे.  अनामत रक्कम एनईएफटी व आरटीजीएसद्वारे भरण्याकरिता चलन निर्मिती दि. १६ ऑगस्ट ,२०१८ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केली जाऊ शकते. तसेच अर्जदार दि. १८ ऑगस्ट, पर्यंत चलन बँकेत सादर करू शकतात. कोंकण मंडळातर्फे दि . १७ जुलै, २०१८ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर अर्ज भरण्याकरिता नागरिकांना केवळ २४ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. करिता म्हाडा कार्यालयात दूरध्वनी वरून नागरिकांनी केलेल्या मागण्यांनुसार सदरील मुदतवाढीचा निर्णय म्हाडा प्रशासनाने  घेतला आहे.      
      मंडळातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे या सोडतीमध्ये यशस्वी अर्जदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी म्हाडा मुख्यालयात दि. २७ ऑगस्ट २०१८ ते ०१ सप्टेंबर २०१८ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत असलेले योजना संकेत क्रमांकामधील २७०, २७१, २७२ व २७५ विजेत्यांनी कागदपत्रांसह हजर रहावे, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे. 
     सोडतीसाठी स्विकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in  या वेबसाईटवर दि. २२ ऑगस्ट, २०१८ रोजी सायंकाळी ६.०० वाजता केली जाणार असून सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी  दि. २३ ऑगस्ट, २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  


Wednesday, 18 July 2018

म्हाडाच्या कोंकण व नागपूर मंडळाच्या सदनिका सोडतीसाठी अर्ज नोंदणीला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ   


नागपूर, दि. १८ जुलै, २०१८ :- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ९०१८ व नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या १५१४ सदनिकांच्या विक्री सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला . 


          माननीय मुख्यमंत्री यांच्या नागपूर येथील रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमाला राज्याचे माननीय गृहनिर्माण मंत्री श्री. प्रकाश महेता, माननीय गृहनिर्माण राज्यमंत्री श्री. रविंद्र वायकर, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. संजय कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. मिलिंद म्हैसकर उपस्थित होते.  
       याप्रसंगी  म्हाडाच्या माहिती व संचार तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या संगणकीय  सोडत प्रक्रियेच्या आज्ञावलीचे सादरीकरण माननीय मुख्यमंत्री यांनी  बघितले. याप्रसंगी बोलताना श्री. फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन सर्वसामान्य नागरिकांच्या गृहस्वप्नपूर्तीकरीता कटिबद्ध आहे. म्हाडाच्या कोंकण मंडळ व नागपूर मंडळाच्या अखत्यारीतील विविध उत्पन्न गटांकरिता सुमारे दहा हजार सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली आहे . यामध्ये केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कोंकण मंडळाच्या ३९३७ सदनिका तर नागपूर मंडळाच्या १५१४ सदनिकांकरिता केंद्र व राज्य शासनाचे अनुदान मिळणार असल्याने या सदनिका नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहेत.  याकरिता या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माननीय मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दहा लाख घरांचे उद्दिष्ट गाठायचे असल्याने राज्यातील सर्व संबंधित संस्थांनी या नियोजनपूर्तीच्या दिशेने युद्धपातळीवर कामे करावीत व प्रधानमंत्री आवास योजनेतील जास्तीत जास्त सदनिकांचा समावेश या सोडतीत  करावा, असेही याप्रसंगी श्री. फडणवीस यांनी सांगितले.        


          कोंकण मंडळाच्या सोडतीकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सॊडत वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात दि. १९ ऑगस्ट २०१८  रोजी सकाळी दहा वाजता काढण्यात येणार आहे.  या सोडतींकरिता माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सोडतीकरीता दि. ०८/०८/२०१८ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांची नोंदणी केली जाणार आहे.  नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास दि. १९/०७/२०१८ रोजी दुपारी २ वाजेपासून प्रारंभ होणार असून दि. ०९/०८/२०१८ रोजी रात्री ११.५९  वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. दि. १०/०८/२०१८ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनामत रक्कम / अर्ज शुल्क ऑनलाईन भरण्याची मुदत देण्यात आली आहे. 
          सोडत प्रक्रियेकरिता अँक्सिस  बँकेची समन्वयक यंत्रणा म्हणून नेमणूक केली आहे  करीता  नागपूर मधील नागरिकांना अर्ज भरतांना कोणत्याही अडचणी आल्यास त्यांनी ऍक्सिस   बँकेच्या कोणत्याही नजीकच्या शाखेतून मदत घ्यावी.  तसेच कोंकण मंडळाच्या सोडत  प्रक्रियेत अर्जदारांनी  मदतीकरिता ९८६९९८८००० व ०२२-२६५९२६९२/९३ या  हेल्पलाईन क्रमांकांवर  संपर्क साधावा, असे आवाहन म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. मिलिंद म्हैसकर यांनी केले आहे. 
           कोंकण मंडळाच्या सोडतीत यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी मीरा रोड, बाळकूम ठाणे, शिरढोण (ता. कल्याण), खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील एकूण ४,४५५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरढोण (ता. कल्याण) येथील १९०५, खोणी (ता. कल्याण ) येथील २०३२ इतक्या अत्यल्प गटातील सदनिकांचा समावेश असून प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत अर्जदाराचे व त्याच्या कुटुंबियांचे  भारतात कुठेही स्वमालकीचे घर नसलेला परंतु एमएमआरने अधिसूचित केलेल्या सर्व क्षेत्रातील नागरिकच अर्ज करू शकतात. या योजनेतील घरांसाठी अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तीन लाख इतके मर्यादित आहे.  अल्प उत्पन्न गटाकरिता मीरा रोड, कावेसर ठाणे, वेंगुर्ला सिंधुदुर्ग, विरार बोळींज, खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील ४३४१ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता बाळकूम (ठाणे), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग),  मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी), विरार बोळींज येथील एकूण २१५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता वेंगुर्ला (सिंधुदुर्ग),  मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी) येथील एकूण ७ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.   
          नागपूर मंडळाच्या सोडतीकरिता अर्जदारांच्या नोंदणीला दि. १८/०७/२०१८ रोजी दुपारी २ वाजेपासून प्रारंभ झाला असून दि. ०८/०८/२०१८ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास दि. १९/०७/२०१८ रोजी दुपारी २ वाजेपासून प्रारंभ होणार असून दि. ९/८/२०१८ रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्ज भरता येणार आहे. 
         नागपूर मंडळाच्या १५१४ सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असल्याने अर्जदारांनी महानगरपालिका अथवा नगरपालिकांकडे नोंदणी करणे आवश्यक राहील तसेच सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांना सदनिका वाटपापूर्वी अशी नोंदणी करणे अनिवार्य राहील.   अत्यल्प उत्पन्न गटासाठी वांजरा,  नवीन चंद्रपूर,  बेलरतोडी-नागपूर, चिखली देवस्थान - नागपूर, पिंपळगाव तह - हिंगणघाट (जि. वर्धा), दाभा येथील १३४७ सदनिकांचा समावेश आहे.  अल्प उत्पन्न गटाकरिता वांजरा, दाभा येथील ७७ सदनिकांचा समावेश आहे. तर माध्यम उत्पन्न गटाकरिता  नवीन चंद्रपूर, चिखली देवस्थान - नागपूर, येथील ९० सदनिकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटाकरिता पात्र लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्कात खास सवलत जाहीर केली असून पहिल्या दस्त नोंदणीसाठी रू . १००० मुद्रांक शुल्क आकारण्यात येईल.        
 
                 

Tuesday, 17 July 2018

म्हाडा नागपूर मंडळाच्या १५१४ सदनिका विक्रीची सोडत जाहीर 

अर्ज नोंदणीस उद्यापासून सुरवात ; १९ जुलैपासून अर्ज स्वीकृती   


मुंबई, दि. १७ जुलै २०१८ :- प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडाचा विभागीय घटक) अखत्यारीतील विविध गृह प्रकल्पांतर्गत १५१४ सदनिकांच्या विक्रीची सोडत जाहीर करण्यात आली असून संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणीच्या प्रक्रियेचा शुभारंभ राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या आयोजित करण्यात आला आहे . 
       माननीय मुख्यमंत्री यांच्या नागपूर येथील रामगिरी या शासकीय निवासस्थानी हा कार्यक्रम होणार आहे. सदर सोडतीत सहभागी होण्याकरिता अर्जदारांना दि. १८ जुलै २०१८ दुपारी दोन वाजेपासून अर्ज नोंदणी करता येणार असून नोंदणीकृत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज दि. १९ जुलै २०१८ रोजी दुपारी दोन वाजेपासून भरता येणार आहे. अर्ज नोंदणीकरिता दि. ८ ऑगस्ट रात्री ११.५९ वाजेपर्यंत अंतिम मुदत असणार आहे तसेच अर्ज स्वीकृतीची अंतिम मुदत ९ ऑगस्ट २०१८ रात्री ११.५९  वाजेपर्यंत असणार आहे. 

      सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प    मध्यम उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) रु. २५,०००/ पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,००१ ते रु. ५०,००० पर्यंत व मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. ५०,००१ ते रु. ७५,००० पर्यंत सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विना परतावा) अत्यल्प उत्पन्न गटाकरिता रु. ५,४४८/- प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटाकरिता रु. १०,४४८ प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. १५,४४८ प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज  रु. ४४८ (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे. सोडतीची विस्तृत माहिती https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.    

     यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी नागपूर येथील वांजरा, बेलतरोडी, चिखली देवस्थान, चंद्रपूर येथील नवीन, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आणि नागपूर येथील छाभा (एसडीपीएल ) यांचा प्रकल्प येथील एकूण १३४७ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता वांजरा आणि नागपूर येथील छाभा (एसडीपीएल )  येथील एकूण ७७ सदनिकांचा समावेश आहे. तर मध्यम उत्पन्न गटाकरिता नागपूर येथील  चिखली देवस्थान,  आणि नवीन , चंद्रपूर येथील एकूण ९० सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.                  

     सदनिकांच्या वितरणासाठी  म्हाडाने  कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजन्ट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये. तसे केल्यास नागपूर  मंडळ / म्हाडा कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही.

Monday, 16 July 2018

म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे  १९ ऑगस्ट रोजी ९०१८ सदनिकांची विक्रमी सोडत  


प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३९३७ सदनिकांचा समावेश ;  १८ जुलैपासून अर्जदारांची नोंदणी 


मुंबई, दि. १६ जुलै २०१८ :- केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात परवडणाऱ्या घरांची सर्वाधिक गरज अधोरेखित झाली असतांना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे परवडणाऱ्या घरांची राज्यात सर्वात मोठी म्हणजेच नऊ हजार अठरा सदनिकांची विक्रमी सोडत जाहीर करण्यात आली आहे.
     सोडतीकरिता दि. १८/०७/२०१८ पासून अर्ज नोंदणीला प्रारंभ होणार असून प्राप्त अर्जाची संगणकिय सॊडत वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात दि. १९ ऑगस्ट २०१८  रोजी सकाळी दहा वाजता काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विजय लहाने यांनी दिली.        
     सदर सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरढोण (ता. कल्याण) येथील १९०५, खोणी (ता. कल्याण ) येथील २०३२ इतक्या अत्यल्प गटातील सदनिकांचा समावेश असून या सदनिकांकरिता भारतात कुठेही स्वमालकीचे घर नसलेला परंतु एमएमआरने अधिसूचित केलेल्या सर्व क्षेत्रातील नागरिकच अर्ज करू शकतात. या योजनेतील घरांसाठी अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तीन लाख इतके मर्यादित आहे.   
    सदर सोडतीकरिता माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच संकेतस्थळावर अर्जदारांची नोंदणी दि. १८/०७/२०१८ रोजी दुपारी २ वाजेपासून दि. ०८/०८/२०१८ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केली जाणार आहे.  नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास दि. १९/०७/२०१८ रोजी दुपारी २ वाजेपासून प्रारंभ होणार असून दि. ०९/०८/२०१८ रोजी रात्री ११.५९  वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. दि. १०/०८/२०१८ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनामत रक्कम / अर्ज शुल्क ऑनलाईन भरण्याची मुदत देण्यात आली आहे. कोंकण मंडळातर्फे यंदा प्रथमच अर्जदारांना NEFT / RTGS  द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात आला आहे. त्याचबरोबर  डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड , इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे. 
    या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटाकरिता सन २०१७-२०१८ या आर्थिक वर्षातील अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) रु. २५,०००/ पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,००१ ते रु. ५०,००० पर्यंत व मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. ५०,००१ ते रु. ७५,००० पर्यंत तर उच्च उत्पन्न गटाकरिता अर्जदाराचे रु. ७५,००१ वा त्यापेक्षा जास्त सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विना परतावा) अत्यल्प उत्पन्न गटाकरिता रु. ५,४४८/- प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटाकरिता रु. १०,४४८ प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. १५,४४८ प्रति अर्ज,  उच्च उत्पन्न  गटाकरिता रु. २०,४४८ प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज  रु. ४४८ (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे.
     यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी मीरा रोड, बाळकूम ठाणे, शिरढोण (ता. कल्याण), खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील एकूण ४,४५५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता मीरा रोड, कावेसर ठाणे, वेंगुर्ला सिंधुदुर्ग, विरार बोळींज, खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील ४३४१ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता बाळकूम (ठाणे), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग),  मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी), विरार बोळींज येथील एकूण २१५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता वेंगुर्ला (सिंधुदुर्ग),  मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी) येथील एकूण ७ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
     सदनिकांच्या वितरणासाठी कोणालाही म्हाडाने प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजन्ट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये. तसे केल्यास कोंकण मंडळ / म्हाडा कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही.

Saturday, 7 July 2018

मौजे कोन गिरणी कामगार सोडत-२०१६

यशस्वी गिरणी कामगारांना विकल्प अर्ज सादर करण्यासाठी ३० जुलैपर्यंत मुदत  


मुंबई, दि. ०७ जुलै २०१७ :- मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) अखत्यारीतील पनवेल येथील मौजे कोन येथे बांधलेल्या २४१७ सदनिकांच्या काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार / वारस यांना सदरहू सदनिका नको असल्यास त्यांना त्यांच्या गिरण्यांच्या जागेवर होत असलेल्या अथवा होणार असलेल्या सदनिकांच्या सोडतीमध्ये भाग घेण्याचा विकल्प उपलब्ध करून देण्यात आला आहे.       

     दि. २ डिसेंबर २०१६ रोजीच्या सदर सोडतीनंतर काही गिरणी कामगार संघटनांनी शासनाकडे केलेल्या मागणीनुसार उच्च स्तरीय समितीने दिलेल्या निर्देशानुसार हा विकल्प देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  यशस्वी गिरणी कामगारांनी / त्यांच्या वारसांनी म्हाडाने तयार केलेल्या नमुन्यात विकल्प अर्ज सादर करावयाचा आहे.  सदर विकल्प अर्ज म्हाडाच्या https://mhada.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तसेच वांद्रे पूर्व, मुंबई येथील म्हाडा मुख्यालयात उपमुख्य अधिकारी (गिरणी), कक्ष क्रमांक २०५, पहिला मजला यांच्या कार्यालयातही विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दि. ३० जुलै २०१८ रोजी पर्यंत वांद्रे पूर्व, मुंबई येथील म्हाडाच्या मुख्यालयातील उपमुख्य अधिकारी (गिरणी), कक्ष क्रमांक २०५, पहिला मजला यांच्या कार्यालयात सोडतीमधील यशस्वी अर्जदारांनी शासनाच्या निर्देशानुसार दोन विकल्पांच्या नमुन्यांपैकी स्वेच्छेनुसार कोणताही एक विकल्प समक्ष हजर राहून व ओळख पटवून सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज जमा केल्याची छापील पोच पावती घ्यावी, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे.

       म्हाडातर्फे देण्यात आलेल्या विकल्प अर्ज क्रमांक १ नुसार दि. २ डिसेंबर २०१६ च्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले गिरणी कामगार / वारस ज्यांना मौजे कोन येथील सदनिका घ्यायची आहे त्यांची पात्रता निश्चित करून सदनिका वितरणाची कार्यवाही केली जाणार आहे. विकल्प अर्ज क्रमांक २ नुसार दि. २ डिसेंबर २०१६ च्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले गिरणी कामगार / वारस मूळ गिरणी कामगार ज्या गिरणीमध्ये कामाला होते त्याच गिरणीच्या जमिनीवर बांधलेल्या सदनिकांसाठी भविष्यात जेव्हा कधी सोडत काढण्यात येईल, त्या सोडतीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट करण्यात येईल. विकल्प अर्ज क्रमांक २ भरून दिल्यास मौजे कोन येथील आता मिळणाऱ्या सदनिकेवर त्यांचा कोणताही हक्क राहणार नाही किंवा त्याबाबत गिरणी कामगार / वारस कोणताही दावा करणार नाही. तसेच त्यांना लागलेल्या सदनिकेसाठी प्रतीक्षा यादीवरील पुढील अर्जदारास संधी देण्यास त्यांची काहीही हरकत राहणार नाही.    

       यशस्वी गिरणी कामगार / वारस यांनी कोणताही विकल्प न दिल्यास किंवा दोन्ही विकल्प दिल्यास मौजे कोन येथे लागलेली सदनिका पसंत आहे, असे समजण्यात येईल. मयत गिरणी कामगाराच्या बाबतीत एकापेक्षा अधिक वारसांनी अर्ज करून दोन वेगवेगळे विकल्प दिल्यास जो अर्ज प्रथम प्राप्त होईल त्याचा विचार करण्यात येईल. दोन वेगवेगळे अर्ज भरून वेगवेगळे विकल्प दिल्यास जो अर्ज प्रथम प्राप्त होईल त्याचा विचार करण्यात येईल. विकल्प अर्ज विहित वेळेत प्राप्त न झाल्यास मौजे कोन येथील सदनिकेसाठी यशस्वी गिरणी कामगार / वारस यांचा विचार करण्यात येईल. 

        यशस्वी गिरणी कामगार / वारस यांना भ्रमणध्वनीवर संदेश तसेच पोस्टाने पत्र पाठवून विकल्प अर्ज सादर करण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे. 

       म्हाडाला मॉडर्न मिल, कमला मिल, खटाव मिल, फिनिक्स मिल, कोहिनूर मिल नंबर १ (एनटीसी), कोहिनूर मिल नंबर -२ (एनटीसी), पोद्दार मिल (एनटीसी), मफतलाल मिल नंबर-१, मफतलाल मिल नंबर-२, मुकेश टेक्सटाईल मिल या गिरण्यांची जमीन म्हाडाला मिळणार नाही, याची नोंद यशस्वी गिरणी कामगार / वारस यांनी घेण्याचे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे.