Saturday, 7 July 2018

मौजे कोन गिरणी कामगार सोडत-२०१६

यशस्वी गिरणी कामगारांना विकल्प अर्ज सादर करण्यासाठी ३० जुलैपर्यंत मुदत  


मुंबई, दि. ०७ जुलै २०१७ :- मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) अखत्यारीतील पनवेल येथील मौजे कोन येथे बांधलेल्या २४१७ सदनिकांच्या काढण्यात आलेल्या सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार / वारस यांना सदरहू सदनिका नको असल्यास त्यांना त्यांच्या गिरण्यांच्या जागेवर होत असलेल्या अथवा होणार असलेल्या सदनिकांच्या सोडतीमध्ये भाग घेण्याचा विकल्प उपलब्ध करून देण्यात आला आहे.       

     दि. २ डिसेंबर २०१६ रोजीच्या सदर सोडतीनंतर काही गिरणी कामगार संघटनांनी शासनाकडे केलेल्या मागणीनुसार उच्च स्तरीय समितीने दिलेल्या निर्देशानुसार हा विकल्प देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  यशस्वी गिरणी कामगारांनी / त्यांच्या वारसांनी म्हाडाने तयार केलेल्या नमुन्यात विकल्प अर्ज सादर करावयाचा आहे.  सदर विकल्प अर्ज म्हाडाच्या https://mhada.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तसेच वांद्रे पूर्व, मुंबई येथील म्हाडा मुख्यालयात उपमुख्य अधिकारी (गिरणी), कक्ष क्रमांक २०५, पहिला मजला यांच्या कार्यालयातही विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दि. ३० जुलै २०१८ रोजी पर्यंत वांद्रे पूर्व, मुंबई येथील म्हाडाच्या मुख्यालयातील उपमुख्य अधिकारी (गिरणी), कक्ष क्रमांक २०५, पहिला मजला यांच्या कार्यालयात सोडतीमधील यशस्वी अर्जदारांनी शासनाच्या निर्देशानुसार दोन विकल्पांच्या नमुन्यांपैकी स्वेच्छेनुसार कोणताही एक विकल्प समक्ष हजर राहून व ओळख पटवून सादर करणे बंधनकारक आहे. अर्ज जमा केल्याची छापील पोच पावती घ्यावी, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे.

       म्हाडातर्फे देण्यात आलेल्या विकल्प अर्ज क्रमांक १ नुसार दि. २ डिसेंबर २०१६ च्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले गिरणी कामगार / वारस ज्यांना मौजे कोन येथील सदनिका घ्यायची आहे त्यांची पात्रता निश्चित करून सदनिका वितरणाची कार्यवाही केली जाणार आहे. विकल्प अर्ज क्रमांक २ नुसार दि. २ डिसेंबर २०१६ च्या सोडतीमध्ये यशस्वी झालेले गिरणी कामगार / वारस मूळ गिरणी कामगार ज्या गिरणीमध्ये कामाला होते त्याच गिरणीच्या जमिनीवर बांधलेल्या सदनिकांसाठी भविष्यात जेव्हा कधी सोडत काढण्यात येईल, त्या सोडतीमध्ये त्यांचे नाव समाविष्ट करण्यात येईल. विकल्प अर्ज क्रमांक २ भरून दिल्यास मौजे कोन येथील आता मिळणाऱ्या सदनिकेवर त्यांचा कोणताही हक्क राहणार नाही किंवा त्याबाबत गिरणी कामगार / वारस कोणताही दावा करणार नाही. तसेच त्यांना लागलेल्या सदनिकेसाठी प्रतीक्षा यादीवरील पुढील अर्जदारास संधी देण्यास त्यांची काहीही हरकत राहणार नाही.    

       यशस्वी गिरणी कामगार / वारस यांनी कोणताही विकल्प न दिल्यास किंवा दोन्ही विकल्प दिल्यास मौजे कोन येथे लागलेली सदनिका पसंत आहे, असे समजण्यात येईल. मयत गिरणी कामगाराच्या बाबतीत एकापेक्षा अधिक वारसांनी अर्ज करून दोन वेगवेगळे विकल्प दिल्यास जो अर्ज प्रथम प्राप्त होईल त्याचा विचार करण्यात येईल. दोन वेगवेगळे अर्ज भरून वेगवेगळे विकल्प दिल्यास जो अर्ज प्रथम प्राप्त होईल त्याचा विचार करण्यात येईल. विकल्प अर्ज विहित वेळेत प्राप्त न झाल्यास मौजे कोन येथील सदनिकेसाठी यशस्वी गिरणी कामगार / वारस यांचा विचार करण्यात येईल. 

        यशस्वी गिरणी कामगार / वारस यांना भ्रमणध्वनीवर संदेश तसेच पोस्टाने पत्र पाठवून विकल्प अर्ज सादर करण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे. 

       म्हाडाला मॉडर्न मिल, कमला मिल, खटाव मिल, फिनिक्स मिल, कोहिनूर मिल नंबर १ (एनटीसी), कोहिनूर मिल नंबर -२ (एनटीसी), पोद्दार मिल (एनटीसी), मफतलाल मिल नंबर-१, मफतलाल मिल नंबर-२, मुकेश टेक्सटाईल मिल या गिरण्यांची जमीन म्हाडाला मिळणार नाही, याची नोंद यशस्वी गिरणी कामगार / वारस यांनी घेण्याचे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे.   


No comments:

Post a Comment