Wednesday 18 July 2018

म्हाडाच्या कोंकण व नागपूर मंडळाच्या सदनिका सोडतीसाठी अर्ज नोंदणीला मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ   


नागपूर, दि. १८ जुलै, २०१८ :- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) घटक असलेल्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या ९०१८ व नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या १५१४ सदनिकांच्या विक्री सोडतीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आला . 


          माननीय मुख्यमंत्री यांच्या नागपूर येथील रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित कार्यक्रमाला राज्याचे माननीय गृहनिर्माण मंत्री श्री. प्रकाश महेता, माननीय गृहनिर्माण राज्यमंत्री श्री. रविंद्र वायकर, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. संजय कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. मिलिंद म्हैसकर उपस्थित होते.  
       याप्रसंगी  म्हाडाच्या माहिती व संचार तंत्रज्ञान विभागाने विकसित केलेल्या संगणकीय  सोडत प्रक्रियेच्या आज्ञावलीचे सादरीकरण माननीय मुख्यमंत्री यांनी  बघितले. याप्रसंगी बोलताना श्री. फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन सर्वसामान्य नागरिकांच्या गृहस्वप्नपूर्तीकरीता कटिबद्ध आहे. म्हाडाच्या कोंकण मंडळ व नागपूर मंडळाच्या अखत्यारीतील विविध उत्पन्न गटांकरिता सुमारे दहा हजार सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली आहे . यामध्ये केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत कोंकण मंडळाच्या ३९३७ सदनिका तर नागपूर मंडळाच्या १५१४ सदनिकांकरिता केंद्र व राज्य शासनाचे अनुदान मिळणार असल्याने या सदनिका नागरिकांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार आहेत.  याकरिता या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन माननीय मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दहा लाख घरांचे उद्दिष्ट गाठायचे असल्याने राज्यातील सर्व संबंधित संस्थांनी या नियोजनपूर्तीच्या दिशेने युद्धपातळीवर कामे करावीत व प्रधानमंत्री आवास योजनेतील जास्तीत जास्त सदनिकांचा समावेश या सोडतीत  करावा, असेही याप्रसंगी श्री. फडणवीस यांनी सांगितले.        


          कोंकण मंडळाच्या सोडतीकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सॊडत वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात दि. १९ ऑगस्ट २०१८  रोजी सकाळी दहा वाजता काढण्यात येणार आहे.  या सोडतींकरिता माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सोडतीकरीता दि. ०८/०८/२०१८ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदारांची नोंदणी केली जाणार आहे.  नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास दि. १९/०७/२०१८ रोजी दुपारी २ वाजेपासून प्रारंभ होणार असून दि. ०९/०८/२०१८ रोजी रात्री ११.५९  वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. दि. १०/०८/२०१८ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत अनामत रक्कम / अर्ज शुल्क ऑनलाईन भरण्याची मुदत देण्यात आली आहे. 
          सोडत प्रक्रियेकरिता अँक्सिस  बँकेची समन्वयक यंत्रणा म्हणून नेमणूक केली आहे  करीता  नागपूर मधील नागरिकांना अर्ज भरतांना कोणत्याही अडचणी आल्यास त्यांनी ऍक्सिस   बँकेच्या कोणत्याही नजीकच्या शाखेतून मदत घ्यावी.  तसेच कोंकण मंडळाच्या सोडत  प्रक्रियेत अर्जदारांनी  मदतीकरिता ९८६९९८८००० व ०२२-२६५९२६९२/९३ या  हेल्पलाईन क्रमांकांवर  संपर्क साधावा, असे आवाहन म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. मिलिंद म्हैसकर यांनी केले आहे. 
           कोंकण मंडळाच्या सोडतीत यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी मीरा रोड, बाळकूम ठाणे, शिरढोण (ता. कल्याण), खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील एकूण ४,४५५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शिरढोण (ता. कल्याण) येथील १९०५, खोणी (ता. कल्याण ) येथील २०३२ इतक्या अत्यल्प गटातील सदनिकांचा समावेश असून प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत अर्जदाराचे व त्याच्या कुटुंबियांचे  भारतात कुठेही स्वमालकीचे घर नसलेला परंतु एमएमआरने अधिसूचित केलेल्या सर्व क्षेत्रातील नागरिकच अर्ज करू शकतात. या योजनेतील घरांसाठी अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न तीन लाख इतके मर्यादित आहे.  अल्प उत्पन्न गटाकरिता मीरा रोड, कावेसर ठाणे, वेंगुर्ला सिंधुदुर्ग, विरार बोळींज, खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील ४३४१ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता बाळकूम (ठाणे), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग),  मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी), विरार बोळींज येथील एकूण २१५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता वेंगुर्ला (सिंधुदुर्ग),  मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी) येथील एकूण ७ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.   
          नागपूर मंडळाच्या सोडतीकरिता अर्जदारांच्या नोंदणीला दि. १८/०७/२०१८ रोजी दुपारी २ वाजेपासून प्रारंभ झाला असून दि. ०८/०८/२०१८ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास दि. १९/०७/२०१८ रोजी दुपारी २ वाजेपासून प्रारंभ होणार असून दि. ९/८/२०१८ रोजी रात्री ११.५९ पर्यंत अर्ज भरता येणार आहे. 
         नागपूर मंडळाच्या १५१४ सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत असल्याने अर्जदारांनी महानगरपालिका अथवा नगरपालिकांकडे नोंदणी करणे आवश्यक राहील तसेच सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांना सदनिका वाटपापूर्वी अशी नोंदणी करणे अनिवार्य राहील.   अत्यल्प उत्पन्न गटासाठी वांजरा,  नवीन चंद्रपूर,  बेलरतोडी-नागपूर, चिखली देवस्थान - नागपूर, पिंपळगाव तह - हिंगणघाट (जि. वर्धा), दाभा येथील १३४७ सदनिकांचा समावेश आहे.  अल्प उत्पन्न गटाकरिता वांजरा, दाभा येथील ७७ सदनिकांचा समावेश आहे. तर माध्यम उत्पन्न गटाकरिता  नवीन चंद्रपूर, चिखली देवस्थान - नागपूर, येथील ९० सदनिकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटाकरिता पात्र लाभार्थ्यांना महाराष्ट्र शासनाने मुद्रांक शुल्कात खास सवलत जाहीर केली असून पहिल्या दस्त नोंदणीसाठी रू . १००० मुद्रांक शुल्क आकारण्यात येईल.        
 
                 

No comments:

Post a Comment