कोंकण मंडळाच्या पात्रता तपासणी शिबिरास अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
८३० अर्जदारांना देकारपत्र प्रदान, १७०० अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी ; ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई, दि. ०४ सप्टेंबर, २०१८ :- म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे वांद्रे पूर्व येथील म्हाडा
मुख्यालयात राबविण्यात येत असलेल्या पात्रता तपासणी शिबिरात गेल्या आठ
दिवसांत सुमारे ८३० अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र देण्यात आले असून एकूण १७०० अर्जदारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विजय लहाने यांनी आज दिली.
कोंकण मंडळातर्फे ९०१८ सदनिकांसाठी दि. २५ ऑगस्ट रोजी संगणकीय सोडत
काढण्यात आली. या सोडतीतील यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करून त्यांची पात्रता निश्चिती करण्यासाठी कोंकण मंडळाने दि. २७.०८.२०१८ ते ०१.०९.२०१८ या कालावधीत शिबीर आयोजित
केले. अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता या शिबिराला येत्या दि. ७
सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या शिबिराच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत संकेत क्रमांक २७०, २७१ व एकात्मिक / विशेष नगर वसाहत प्रकल्पाअंतर्गतच्या संकेत क्रमांक २७२ व २७५ मधील यशस्वी अर्जदारांच्या कागदपत्रांची छाननी करून तात्पुरते देकार पात्र देण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासणाऱ्या म्हाडाने माणुसकीचा आणखी एक
अनोखा इतिहास रचला. संकेत क्रमांक २७२ कल्याण खोणी येथील अपंग प्रवर्गातून
श्री. नामदेव नलावडे हे यशस्वी अर्जदार ठरले आहेत. शारीरिकदृष्ट्या अपंग
असलेले श्री. नलावडे हे या पात्रता तपासणी शिबिरात कागदपत्रे घेऊन आल्याचे
समजताच
कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विजय लहाने यांनी त्यांच्या
कागदपत्रांची तपासणी तत्परतेने करवून घेत त्यांची पात्रता निश्चिती केली.
श्री. लहाने यांनी स्वतः श्री. नलावडे यांना त्यांच्या वाहनापर्यंत जाऊन
देकारपत्र दिले. या प्रकाराने श्री. नलावडे
देखील भारावून गेले.
या शिबिरात पात्रता तपासणी करीता
राज्यातील अनेक ठिकाणांवरून अर्जदार येत आहेत, अशा बाहेरगावाहून येणाऱ्या
अर्जदारांना या शिबिरात प्राधान्य देण्यात येत आहे . किमान दोन ते तीन
महिने कालावधी घेणारी पात्रता निश्चितीची ही प्रक्रिया केवळ काही दिवसातच
पूर्ण होत आहे. म्हाडाच्या या तत्पर कार्यप्रणालीवर खुश होऊन अनेक अर्जदार
त्यांना मिठाईचे पुडे देऊन आभार व्यक्त करत आहेत. अर्जदारांच्या
सोयीकरीता हे शिबीर यापुढे ७ सप्टेंबरपर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय कोंकण
मंडळ
प्रशासनाने घेतला असल्याचे श्री. लहाने यांनी सांगितले .
No comments:
Post a Comment