Wednesday, 30 May 2018

गृहनिर्मितीस वेग देणारे तीन स्वतंत्र कक्ष 'म्हाडा'त कार्यान्वित

शासनाने नियोजन प्राधिकरणाचा दर्जा प्रदान केल्यानंतर 'म्हाडा'ने उचलले पाऊल 

मुंबई, दि. ३० मे २०१८ :-  महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) राज्य शासनाने नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर, पुनर्वसन प्रस्तावांना चालना देण्याकरिता म्हाडा मुख्यालयात अभिन्यास मंजुरी (Layout Approval) कक्ष, बृहन्मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव परवानगी (Building permissions) कक्ष व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत येणारे इमारत प्रस्ताव परवानगी या कामांसाठी तीन स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.     
       महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने दि. २३ मे २०१८ रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार 'म्हाडा'ला बृहन्मुंबई क्षेत्रातील म्हाडाचे ११४ अभिन्यास (लेआऊट) व राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत म्हाडा स्वतः अथवा संयुक्त विद्यमाने राबवित असलेल्या व सार्वजनिक - खाजगी भागीदारी अंतर्गत म्हाडा सुकाणू अभिकरण असलेल्या प्रकल्पांसाठी नियोजन प्राधिकरणाचा (Planning Authority) दर्जा नुकताच प्रदान केला आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडा कार्यालयात सदर कक्ष सुरु करण्यात आले आहेत. ज्यामुळे परवडणाऱ्या सदनिकांच्या निर्मितीला अधिक वेग मिळणार आहे.     
       या कक्षांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या परवानग्या ऑनलाईन पद्धतीने मिळाव्यात या करीता बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंगीकृत केलेली संगणकीय  आज्ञावली पालिकेच्या परवानगीने जशीच्या तशी म्हाडा कार्यालयातील सदरील कक्षांमध्ये वापरण्यात येणार आहे. या कक्षांमधील कामकाज सुलभ व सुरळीतरित्या पार पाडण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अनुभवी अभियंत्यांची याकामी मदत घेण्यात येणार आहे. तसेच सदरील तीनही कक्षात ही नवीन यंत्रणा अधिक सक्षमतेने राबविण्याकरिता म्हाडातील अभियंते व वास्तुविशारद यांना तीन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दि. १, २ व ४ जून दरम्यान आयोजित प्रशिक्षणात नगर नियोजन व नगर रचना क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.   
       मा. प्रधानमंत्री महोदयांच्या "सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे " या संकल्पनेच्या अनुषंगाने केंद्र शासनाने नागरी भागाकरिता प्रधान मंत्री आवास योजना (शहरी) जाहीर केली आहे. केंद्र शासनाने महाराष्ट्रात सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी 'म्हाडा'ची सुकाणू अभिकरण (Nodal Agency) म्हणून नियुक्ती केली आहे. या योजनेसाठी म्हाडामध्ये पीएमएवाय कक्ष कार्यान्वित आहे. या कक्षाच्या कार्य कक्षेचा विस्तार करून सुकाणू अभिकरण म्हणून येणारे प्रधान मंत्री आवास योजनेचे प्रस्ताव + दि. २३.०५.२०१८ रोजीच्या अधिसूचनेमध्ये नमूद म्हाडा स्वतः अथवा संयुक्त विद्यमाने राबवित असलेल्या व सार्वजनिक - खाजगी भागीदारी अंतर्गत म्हाडा सुकाणू अभिकरण असलेल्या प्रकल्पांसाठी इमारत परवानगी  (Building permissions)  म्हाडात कार्यान्वित पीएमएवाय कक्षामार्फत दिल्या जाणार आहेत.
         अभिन्यास मंजुरी (Layout Approval) कक्ष म्हाडातील वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ व रचनाकार यांच्या कार्यालयात,  बृहन्मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव परवानगी (Building permissions) कक्ष कार्यकारी अभियंता -२ / प्राधिकरण यांच्या कार्यालयात तर पीएमएवाय इमारत परवानगी कक्ष कार्यकारी अभियंता, पीएमएवाय प्रकल्प यांच्या कार्यालयात कार्यान्वित करण्यात आला आहे.          

No comments:

Post a Comment