Sunday, 7 January 2018

म्हाडामार्फत बदानी बोहरी चाळीतील ८८ रहिवाशांची गृहस्वप्नपूर्ती

 

पुनर्विकसित उपकरप्राप्त इमारतीतील सदनिकांची संगणकिय सोडत उत्साहात    


मुंबई, दि. ०५ जानेवारी २०१८ :-  महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे लालबाग येथील बदानी बोहरी चाळीतील ८८ पुनर्विकसित इमारतीतील सदनिकांची आज संगणकीय पद्धतीने सोडत काढण्यात आली.
       वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे आयोजित या सोडतीला आमदार श्री. अजय चौधरी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सुमंत भांगे उपस्थित होते.
       श्री. चौधरी म्हणाले कि, " लोकप्रतिनिधी-प्रशासन-रहिवाशी यांचे एकमत झाल्यामुळे चाळीतली रहिवाशांची गृहस्वप्नपूर्ती होऊ शकली. सदर इमारतीचा उपकरप्राप्त इमारतीतील भाडेकरू / रहिवाशांनी जुन्या व मोडकळीस आलेली इमारतीच्या पुनर्विकासासाठी खासगी विकासकाच्या मागे न लागता "म्हाडा"च्या माध्यमातून या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करावा. म्हाडाच्या माध्यमातून जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीचा पुनर्विकास केल्यास तो झपाट्याने होईल व इमारतीचे बांधकामही अतिउत्कृष्ट दर्जाचे मिळू शकेल, बदानी बोहरी चाळ हे याचे उत्तम उदाहरण आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या पुनर्रचित इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. मुंबईच्या हृदयस्थानी असणारी हि घरे रहिवाशांनी विकू नये, असे आवाहनही त्यांनी केले. "
       श्री. भांगे म्हणाले कि, "बदानी बोहरी चाळ या म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीतील ८८ रहिवाशांना सन २००२ मध्ये संक्रमण गाळ्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले. सन २०१५ मध्ये सदर चाळीच्या पुनर्विकासाला प्रारंभ झाला. अवघ्या तीन वर्षात सदर इमारतीचे काम पूर्ण करून रहिवाशांना पुनर्रचित इमारतीत प्रत्यक्ष आज ताबा देण्यात आला आहे. सदर पुनर्रचित इमारतीत ८८ गाळ्यांव्यतिरिक्त मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला विक्रीयोग्य ६८ निवासी सदनिका व १ अनिवासी गाळा उपलब्ध झाला असून म्हाडाने अर्थसंकल्पात तरतूद करून हे गाळे बांधले असल्यामुळे सदर गाळे मुंबई मंडळाकडे सोडतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत."
       यावेळी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी श्री. अविनाश गोठे, उपमुख्य अधिकारी श्री. मिलिंद कुलकर्णी यांच्यासह चाळीतील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment