Friday, 19 January 2018

म्हाडाच्या विरार बोळींज येथील ५४४६ सदनिकांच्या
सर्वात मोठ्या गृहप्रकल्पास भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त

पात्र अर्जदारांना सदनिकांचा ताबा देण्याचा मार्ग सुकर
मुंबई, दि. १९ जानेवारी २०१८ :- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्फे विरार बोळींज येथे उभारण्यात आलेल्या ५४४६ सदनिकांच्या सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाला वसई-विरार महानगरपालिकेतर्फे भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे सोडतीमधील यशस्वी व पात्र अर्जदारांना सदनिकांचा ताबा देण्याचा मार्ग सुकर झाला आहे. 
          येत्या आठ दिवसांत सदर सोडतीमधील यशस्वी व पात्र अर्जदारांना देकारपत्र देण्यात येईल. पात्र अर्जदारांनी एक्सिस बँकेतून देकारपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विजय लहाने यांनी केले आहे. पात्र अर्जदारांनी सदनिकेची संपूर्ण विक्री किंमत अदा केल्यास त्यांना त्वरित सदनिकेचा ताबा देखील देण्यात येईल, असे श्री. लहाने यांनी सांगितले.                              
              सदर प्रकल्पाअंतर्गत टप्पा १ व टप्पा २ मध्ये ५० इमारतींमधील ५४४६ सदनिकांची सन २०१४ व सन २०१६ मध्ये संगणकीय सोडत काढण्यात आली. २२ ते २४ मजल्याच्या असणाऱ्या  या सर्व इमारतींचे बांधकाम मार्च - २०१७ मध्ये पूर्ण झाले. तथापि बहुमजली इमारतीसाठी आवश्यक असलेली अग्निशमन शिडी वसई-विरार महानगरपालिकेकडे नसल्याने सदर शिडी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. या अनुषंगाने वसई-विरार महानगरपालिका, म्हाडा व संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांच्यात झालेल्या बैठकीत अग्निशमन शिडीच्या किंमतीपोटी "म्हाडा"ने वसई विरार महानगरपालिकेला २०.४५ कोटी रुपये (वीस पूर्णांक पंचेचाळीस कोटी रुपये) एवढी रक्कम अदा केली आहे. तसेच अग्निशमन केंद्राची उभारणीही करून दिली आहे. "म्हाडा"चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलिंद म्हैसकर यांच्या प्रयत्नामुळे हा प्रकल्प मार्गी लागला. सदर प्रकल्पाअंतर्गत तीन टप्प्यात दहा हजार परवडणारी घरे उभारण्यात येणार आहेत.    
       

Monday, 8 January 2018

धारावी सेक्टर - ५ पुनर्विकास प्रकल्प

"म्हाडा"तर्फे २१ पात्र झोपडीधारकांना सदनिकांचे वाटप

मुंबई, दि. ०८ जानेवारी २०१८ :- मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ मध्ये उभारण्यात आलेल्या पथदर्शी इमारतीतील पुनर्वसन सदनिकांचे धारावीतील क्लस्टर जे मधील २१ निवासी पात्र झोपडीधारकांना आज चिट्ठी पद्धतीने सोडत काढून वाटप करण्यात आले.
    वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील गुलझारीलाल नंदा सभागृहात आयोजित या सोडतीला मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सहमुख्य अधिकारी श्री. संजय भागवत, उपमुख्य अधिकारी श्री. टी. पी. राठोड, उपनिबंधक श्री. राजेंद्र गायकवाड, सहकारी अधिकारी श्री. आर. बी. जाधव, सक्षम प्राधिकारी श्रीमती भोसले आदी उपस्थित होते.
    यावेळी पात्र झोपडीधारकांना इमारतीतील कुठल्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका वाटप करावयाची यासंदर्भात चिट्ठी काढून निर्णय घेण्यात आला. सदर सदनिकांचा ताबा पात्र झोपडीधारकांना लवकरच दिला जाणार आहे. सदर इमारतीत ३०० चौरस फुटाच्या (कार्पेट) ३५८ सदनिका आहेत. मे-२०१६ मध्ये २६६ पात्र निवासी झोपडीधारकांना तसेच ६५ निवासी पात्र झोपडीधारकांना मार्च-२०१७ मध्ये पुनर्वसन सदनिकेचा ताबा देण्यात आला आहे.

---


मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ मध्ये उभारण्यात आलेल्या पथदर्शी इमारतीतील पुनर्वसन सदनिकेचे वाटप पात्र झोपडीधारक श्रीमती विजया शिंदे यांना करतांना सहमुख्य अधिकारी श्री. संजय भागवत. समवेत उपमुख्य अधिकारी श्री. टी. पी. राठोड, मिळकत व्यवस्थापक श्री. प्रमोद कांबळे आदी.  
-------


Sunday, 7 January 2018

धारावी सेक्टर - ५ पुनर्विकास प्रकल्प   

"म्हाडा"तर्फे  २१ पात्र झोपडीधारकांना सदनिका वाटपासाठी ८ जानेवारीला सोडत
   

मुंबई, दि. ०६ जानेवारी २०१८ :- मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ मध्ये उभारण्यात आलेल्या पथदर्शी इमारतीतील पुनर्वसन सदनिकांचे वाटप धारावीतील क्लस्टर जे मधील २१ निवासी पात्र झोपडीधारकांना करण्यासाठी दि. ०८ जानेवारी २०१८ रोजी दुपारी दोन वाजता चिट्ठी पद्धतीने सोडत काढण्यात येणार आहे.
     वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील गुलझारीलाल नंदा सभागृहात आयोजित सदर सोडतीत पात्र झोपडीधारकांना इमारतीतील कुठल्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका वाटप करावयाची यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. सदर इमारतीत ३०० चौरस फुटाच्या (कार्पेट) ३५८ सदनिका आहेत. मे-२०१६ मध्ये २६६ पात्र निवासी झोपडीधारकांना तसेच ६५ निवासी पात्र झोपडीधारकांना मार्च-२०१७ मध्ये पुनर्वसन सदनिकेचा ताबा देण्यात आला आहे.

म्हाडामार्फत बदानी बोहरी चाळीतील ८८ रहिवाशांची गृहस्वप्नपूर्ती

 

पुनर्विकसित उपकरप्राप्त इमारतीतील सदनिकांची संगणकिय सोडत उत्साहात    


मुंबई, दि. ०५ जानेवारी २०१८ :-  महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे लालबाग येथील बदानी बोहरी चाळीतील ८८ पुनर्विकसित इमारतीतील सदनिकांची आज संगणकीय पद्धतीने सोडत काढण्यात आली.
       वांद्रे पूर्व येथील समाज मंदिर हॉल येथे आयोजित या सोडतीला आमदार श्री. अजय चौधरी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सुमंत भांगे उपस्थित होते.
       श्री. चौधरी म्हणाले कि, " लोकप्रतिनिधी-प्रशासन-रहिवाशी यांचे एकमत झाल्यामुळे चाळीतली रहिवाशांची गृहस्वप्नपूर्ती होऊ शकली. सदर इमारतीचा उपकरप्राप्त इमारतीतील भाडेकरू / रहिवाशांनी जुन्या व मोडकळीस आलेली इमारतीच्या पुनर्विकासासाठी खासगी विकासकाच्या मागे न लागता "म्हाडा"च्या माध्यमातून या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करावा. म्हाडाच्या माध्यमातून जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतीचा पुनर्विकास केल्यास तो झपाट्याने होईल व इमारतीचे बांधकामही अतिउत्कृष्ट दर्जाचे मिळू शकेल, बदानी बोहरी चाळ हे याचे उत्तम उदाहरण आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून या पुनर्रचित इमारतीची उभारणी करण्यात आली आहे. मुंबईच्या हृदयस्थानी असणारी हि घरे रहिवाशांनी विकू नये, असे आवाहनही त्यांनी केले. "
       श्री. भांगे म्हणाले कि, "बदानी बोहरी चाळ या म्हाडाच्या उपकरप्राप्त इमारतीतील ८८ रहिवाशांना सन २००२ मध्ये संक्रमण गाळ्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आले. सन २०१५ मध्ये सदर चाळीच्या पुनर्विकासाला प्रारंभ झाला. अवघ्या तीन वर्षात सदर इमारतीचे काम पूर्ण करून रहिवाशांना पुनर्रचित इमारतीत प्रत्यक्ष आज ताबा देण्यात आला आहे. सदर पुनर्रचित इमारतीत ८८ गाळ्यांव्यतिरिक्त मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाला विक्रीयोग्य ६८ निवासी सदनिका व १ अनिवासी गाळा उपलब्ध झाला असून म्हाडाने अर्थसंकल्पात तरतूद करून हे गाळे बांधले असल्यामुळे सदर गाळे मुंबई मंडळाकडे सोडतीमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत."
       यावेळी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी श्री. अविनाश गोठे, उपमुख्य अधिकारी श्री. मिलिंद कुलकर्णी यांच्यासह चाळीतील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.