Thursday, 5 October 2017


म्हाडाकडे वि. नि. नि. ३३ (५) अंतर्गत प्राप्त पुनर्विकास प्रस्तावांबाबत तातडीने कार्यवाही करा - श्री. प्रकाश मेहता


मुंबई, दि. ०५ ऑक्टोबर २०१७ :- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वसाहतींमधील जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अन्वये शासनाने सन २०१३ च्या अधिसूचनेमध्ये फेरबदलाची अधिसुचना दि. ०३.०७.२०१७ रोजी जारी केली. या फेरबदलाच्या अधिसूचनेनंतर १३ सहकारी गृहनिर्माण संस्थांनी त्यांच्या इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रस्ताव म्हाडाकडे सादर केले आहेत.  या सर्व १३ प्रस्तावांची छाननी करून त्यांना देकार पत्र  देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करावी. तसेच म्हाडाच्या ५६ वसाहतींमधील जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा (Planning Authority) दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव सादर करावा, असे आदेश राज्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. प्रकाश मेहता यांनी दिले.
       वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात म्हाडाशी संबंधित विविध विषयांबाबत आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत श्री. मेहता बोलत होते.  श्री. मेहता म्हणाले, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) अखत्यारीतील मुंबई शहरातील धोकादायक उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास अधिक वेगाने होण्यासाठी  सर्वपक्षीय आमदारांच्या समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन कायद्यात बदल-सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव शासनाला सादर करावा. उपकरप्राप्त धोकादायक इमारती त्वरित रिकाम्या करण्याचा प्रयत्न करावा, भाडेकरूंनी अडथळे आणल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. आठ संक्रमण शिबिरांच्या पुनर्विकासास गती देऊन येत्या डिसेंबरअखेरपर्यंत संक्रमण शिबिरांचा प्रश्न मार्गी लावावा. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे असलेल्या सदनिका म्हाडाला संक्रमण गाळे म्हणून देण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा त्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करेल. उपकरप्राप्त इमारतींमध्ये राहणाऱ्या घुसखोरांबाबत निश्चित धोरण तयार करून प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही श्री. मेहता यांनी केली. 
        मुंबई मंडळाच्या विषयांबाबत श्री. मेहता म्हणाले,  वरळी येथील बी. डि. डि. चाळ पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात विकासकाची अंतिम निश्चिती करून कार्यादेश द्यावेत.  
       प्रधानमंत्री आवास योजनेचाही श्री. मेहता यांनी आढावा घेतला. म्हाडाच्या कोंकण मंडळाने  खाजगी विकासकासोबत संयुक्त भागीदारी प्रकल्प राबवून सन २०२२ पर्यंत ५ लाख परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीचे उद्दीष्टे ठेवावे, अशी सूचनाही श्री. मेहता यांनी केली. 
        यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. मिलिंद म्हैसकर म्हणाले, मुंबई शहरातील धोकादायक उपकरप्राप्त इमारतींचा पुनर्विकास अधिक वेगाने होण्यासाठी  सर्वपक्षीय आमदारांच्या समितीने केलेल्या शिफारशी विचारात घेऊन तसेच त्यासंदर्भात अभ्यास करून सर्वंकष प्रस्ताव लवकरच शासनाकडे पाठविला जाईल.  म्हाडाच्या ५६ वसाहतींमधील जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी ज्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला यापूर्वी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे मात्र पुनर्विकासाचे एक टक्काही काम झाले नसेल तर संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेला दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या  सूचना श्री. म्हैसकर यांनी  मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. म्हाडाच्या ५६ वसाहतींमधील जुन्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाला नियोजन प्राधिकरणाचा (Planning Authority) दर्जा मिळावा यासाठी प्रस्ताव लवकरच सादर करू, असे श्री. म्हैसकर यांनी सांगितले.   
      या वेळी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सुभाष लाखे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सुमंत भांगे, कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास  मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विजय लहाने, सहमुख्य अधिकारी श्री. संजय भागवत, श्री. तेजूसिंग पवार आदींसह म्हाडातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 
 
 

Tuesday, 3 October 2017

बी. डी. डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पात एकही अधिकृत निवासी भाडेकरू पुनर्वसित सदनिकेपासून वंचित राहणार नाही –  श्री. प्रकाश मेहता


मुंबई, दि. २८ सप्टेंबर २०१७ :- बी. डी. डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत बायोमेट्रिक सर्वेक्षण, भाडेपावती व गाळा हस्तांतरण या बाबतीत एकत्रितपणे भाडेकरूंच्या पात्रते संदर्भात निकष ठरवावेत व कोणताही पात्र निवासी भाडेकरू बी. डी. डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसित सदनिकेपासून वंचित राहणार नाही याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे.  राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे प्रलंबित असलेली भाडेकरूंची सदनिका हस्तांतरण प्रकरणे (Transfer Cases) तातडीने निकाली काढण्यात येतील तसेच बी. डी. डी. चाळीमधील सद्यस्थितीतील मोकळी जागा,  मैदाने यांचे प्रमाण पुनर्विकास प्रकल्प राबविल्यानंतर देखील कायम राहील याची काळजी प्रकल्प आराखड्यात  घेण्यात आली आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री श्री. प्रकाश मेहता यांनी आज केले. 
     महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) च्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात  बी. डी. डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी व  बी. डी. डी. चाळीतील विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासंदर्भात आयोजित बैठकीत श्री. मेहता बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार श्री. कालिदास कोळंबकर, आमदार श्री. सुनील शिंदे,  नगरसेविका श्रीमती स्नेहल आंबेकर, नगरसेविका श्रीमती. पांचाळ, श्री. सुनील राणे, म्हाडाचे उपाध्यक्ष श्री. मिलिंद म्हैसकर, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सुभाष लाखे,  श्री. राजू वाघमारे, सहमुख्य अधिकारी श्री. संजय भागवत आदी उपस्थित होते.
    श्री. मेहता म्हणाले, की "  विकास नियंत्रण नियमावली ३३ (९) (ब) मधील तरतुदीनुसार पुनर्वसन इमारतीच्या १० वर्ष देखभालीसाठी लागणाऱ्या खर्चाबाबत कॉर्पस फंडची तरतूद म्हाडामार्फत करण्यात येणार आहे. पात्र निवासी भाडेकरूंसोबत संक्रमण गाळा व नवीन मालकी तत्त्वावरील पुनर्वसन गाळ्यासाठी करण्यात येणारे प्रारूप मसुदा करारनामे म्हाडाच्या https://mhada.maharashtra.gov.in या  संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असून या संदर्भात भाडेकरूंनीं काही सूचना असल्यास  पाठवाव्यात. त्याबाबत  नियमाच्या अधीन राहून सकारात्मतक विचार करण्यात येईल. यापूर्वी  बी. डी. डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी व स्थानिक रहिवाशांसोबत १२ बैठका घेण्यात आल्या असून यामध्ये बी. डी. डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत तपशीलवार माहिती रहिवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच बी. डी. डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत अद्ययावत तपशील https://mhada.maharashtra.gov.in या  संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेला आहे.  शासनाचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून भाडेकरूंनी या  प्रकल्पास सहकार्य करावे. बी. डी. डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पात मास्टर प्लॅनमध्ये सर्व धार्मिक स्थळे, स्टॉल, झोपडपट्टी यांच्या संदर्भात नियोजन करण्यात आले आहे.  बी. डी. डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पातील सामायिक सोई सुविधांसंदर्भात पत्रकाद्वारे भाडेकरूंना माहिती देण्यात आली आहे. बी. डी. डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पास सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. म्हाडामार्फत भाडेकरूंसाठी नमुना सदनिका (Sample Flat) नायगाव व ना. म. जोशी मार्ग - परळ येथे लवकरच बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती गृहनिर्माण मंत्र्यांनी यावेळी दिली.
           श्री. म्हैसकर म्हणाले, की " करारनामा करताना नेमका कोणासोबत करारनामा करावा या बाबीची खातरजमा करणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीची ओळख झाली पाहिजे आणि त्या व्यक्तीलाच पुनर्वसित सदनिका दिली गेली पाहिजे. त्यासाठी कागदपत्रे पाहून शहानिशा करणे आवश्यक आहे.  नवीन अद्ययावत घराचा लाभ योग्य व्यक्तीलाच मिळेल याच उद्देशाने हि प्रक्रिया चालू आहे. चार-पाच पिढ्या त्या ठिकाणी वास्तव्य केलेले कुटुंब कोणत्याही परिस्थितीत वंचित राहू नये या उद्देशाने बायोमेट्रिक सर्वे, सर्वेक्षण अर्ज भरून घेणे, वास्तव्याचे पुरावे सादर करणे इ. सर्व प्रक्रिया अमलात आणण्यात येत आहेत.  बी. डी. डी. चाळ पुनर्विकास प्रकल्पासंदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयासंदर्भात संपूर्ण माहिती पत्रकाच्या तसेच विविध माध्यमातून म्हाडामार्फत भाडेकरूंपर्यंत पोहचवण्यात आली आहे."                        
           श्री. लाखे  म्हणाले कि, सदर पुनर्विकास प्रकल्प विविध टप्प्यात सात वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. ना. म. जोशी मार्ग - परळ येथील सात चाळींबाबत  पहिल्या टप्प्यातील बहुतांश भाडेकरूंचे   बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून येथील भाडेकरूंची पात्रता सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत    निश्चित करून व कायदेशीर करारनामे करून लवकरच लगतच्या संक्रमण शिबिरात म्हाडातर्फे स्थलांतरित करून प्रकल्प उभारणी करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. 
         आमदार श्री. कोळंबकर यांनी स्टॉल धारक व झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाबाबत योग्य प्रकारे नियोजन करण्याची मागणी केली.
         आमदार श्री. शिंदे यांनी  बायोमेट्रिक सर्वेक्षणाला ना. म. जोशी मार्ग - परळ येथील रहिवाशांनी पुरेपूर सहकार्य केले. या प्रक्रियेला अधिक वेग आला पाहिजे, अशी मागणी केली. श्री. वाघमारे यांनी पुनर्विकासाबाबत काही मुद्द्यांबाबत अधिक स्पष्टता येणे गरजेचे असल्याचे सांगितले.