म्हाडा पुणे मंडळातर्फे ५ हजार ६४७ सदनिका, ६८ भूखंड विक्रीसाठी संगणकीय सोडत उत्साहात
मुंबई, दि. २२ जानेवारी, २०२१ : पारदर्शक संगणकीय सोडत, सदनिकांचा उत्कृष्ट दर्जा, परवडणारा दर, विश्वासार्हता या वैशिष्ट्यांमुळे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सोडतींना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुणे मंडळाच्या ५ हजार ६४७ सदनिकांच्या सोडतीसाठी ९२ हजार ३३५ अर्जदारांनी केलेले अर्ज हे त्याचेच प्रमाण आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांनी आज केले.
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ५ हजार ६४७ सदनिका व राधानगरी (कोल्हापूर) येथील ६८ भूखंड विक्रीसाठी आज पुणे कॅन्टोन्मेंट येथील नेहरू मेमोरियल हॉल येथे संगणकीय सोडतीचा शुभारंभ उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी श्री. पवार बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. दत्तात्रय भरणे, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती श्री. विनोद घोसाळकर, खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुण्याच्या उपमहापौर श्रीमती सरस्वती शेंडगे, म्हाडाचे मुख्य अभियंता -१ श्री. धीरजकुमार पंदिरकर आदी उपस्थित होते.
श्री. अजित पवार पुढे म्हणाले की, म्हाडावर जनतेने दाखविलेला विश्वास हा कौतुकास्पद आहे. परवडणाऱ्या दरातील घरांची निकड या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या बाबीचा विचार करता भविष्यात म्हाडाने सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात जास्तीत जास्त सदनिका उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे. समाजातील शेवटच्या घटकाला हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सर्वसामान्यांचे गृहस्वप्नपूर्तीचे काम म्हाडाच्या माध्यमातून सुरु आहे. म्हाडाने सदनिका वितरणासाठी कोणत्याही दलालाची, मध्यस्थाची नेमणूक केलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहनही श्री. पवार यांनी केले.
डॉ. नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या की, म्हाडावरील विश्वासामुळे अर्जदारांचा भरघोस प्रतिसाद सोडतीला मिळाला आहे. सोडतीमध्ये म्हाडाने विविध प्रवर्गासाठी आरक्षण ठेऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे म्हाडावरील जबाबदारी आणखी वाढली असून ही जबाबदारी भविष्यातही म्हाडा निश्चित यशस्वीपणे पार पाडेल, असा विश्वास डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केला.
'वेबकास्टिंग' तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण (Live telecast) १ लाख ०८ हजार ३६० नागरिकांनी बघितले.
सोडतीच्या कार्यक्रमात कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करण्यात आले.
प्रास्ताविक म्हाडाच्या पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. नितीन माने यांनी केले. आभार मिळकत व्यवस्थापक श्री. ठाकूर यांनी मानले.