Wednesday, 9 December 2020

म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे ५६४७ सदनिकांच्या
सोडतीसाठी अर्ज नोंदणीला उद्यापासून प्रारंभ


मुंबई, ०९ डिसेंबर,२०२० : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) पुणे, सोलापूर, कोल्हापूर व सांगली येथील विविध गृहनिर्माण योजनेतील ५ हजार ६४७ सदनिका व कोल्हापूर येथील ६८ भूखंडांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी, अर्ज करणे या प्रक्रियेचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालयातील समिती कक्षामध्ये गुरुवार, दिनांक १० डिसेंबर, २०२० रोजी दुपारी २.३० वाजता करण्यात येणार आहे.
    राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली व गृहनिर्माण राज्यमंत्री श्री. सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव श्री. एस. व्ही. आर. श्रीनिवासन, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल डिग्गीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. नितीन माने-पाटील यांनी दिली.     
    या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या पुणे जिल्ह्यातील म्हाळुंगे येथे ५१४ सदनिका, तळेगाव दाभाडे (ता. मावळ) येथे २९६ सदनिका, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे ७७ सदनिका, सांगली येथे ७४ सदनिकांचा समावेश आहे. तसेच  म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या मोरवाडी पिंपरी (पुणे) येथील ८७ सदनिका, पिंपरी वाघिरे (पुणे) येथील ९९२ सदनिका तर सांगली येथील १२९ सदनिकांचा देखील या सोडतीत समावेश आहे. या सोडतीत अत्यल्प , अल्प , मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी सदनिका उपलब्ध आहेत.  तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी येथील ६८ भूखंड देखील या सोडतीत विक्रीसाठी उपलब्ध करवून देण्यात आले आहेत.
    दिनांक १० डिसेंबर, २०२० रोजी दुपारी ३ वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरुवात होणार असून  नोंदणीकृत अर्जदार सायंकाळी ६ वाजेपासून  ऑनलाईन अर्ज भरू शकतील. तसेच  ऑनलाईन अर्ज  नोंदणी दिनांक ११ जानेवारी, २०२१ पर्यंत सायंकाळी ५ वाजेपर्यंत करता येणार आहे.  दिनांक १२ जानेवारी, २०२१ रात्री ११.०० वाजेपर्यंत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज  सादर करता येणार आहेत. दिनांक १३ जानेवारी, २०२१ रोजी रात्री ११.०० पर्यंत ऑनलाइन  अनामत रक्कमेची स्वीकृती केली जाणार आहे. तसेच दिनांक १३ जानेवारी, २०२१ रोजी संबंधित बँकांच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल.       
    https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर सदनिका सोडतीबाबत माहिती पुस्तिका व अर्जाचा नमुना उपलब्ध राहील. दिनांक २२ जानेवारी, २०२१ रोजी प्राप्त अर्जाची सोडत कार्यक्रम पुणे मंडळाच्या कार्यालयात सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात येणार आहे
    सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास पुणे मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे. 

Tuesday, 1 December 2020

'म्हाडा'मध्ये संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन


मुंबई, दि. २६ नोव्हेंबर, २०२० :  भारताच्या घटना परिषदेने देशाची राज्यघटना दिनांक २६ नोव्हेंबर,  १९४९  रोजी देशाला अर्पण केली, या घटनेला ७१ वर्षे होत असल्याचे औचित्य साधत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आज संविधान दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल डिग्गीकर यांनी अधिकारी-कर्मचारी यांच्यासह  छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाला पुष्पांजली अर्पण करून संविधानाच्या उद्देशिकेच्या (Preamble) सामुहिक वाचनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.   
    भारतीय संविधान निर्मितीमधील संस्थापकांच्या योगदानाचा उचित सन्मान व्हावा म्हणून दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. जगातील सर्वोच्च ठरलेल्या भारताच्या संविधानाने देशातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान आणि समानतेचा हक्क दिला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर आधारित भारताच्या संविधानाने देशाला एकजूट ठेवले असून सर्वधर्म समभावाची जोपासना केली आहे. म्हणूनच भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी, याकरिता राज्यात दरवर्षी  संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले जाते. याच पार्श्वभूमीवर आज हा कार्यक्रम घेण्यात आला.
    श्री. अनिल डिग्गीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला म्हाडाचे मुख्य अभियंता-१ श्री. धीरजकुमार पंदिरकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. अरुण डोंगरे, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे, वित्त नियंत्रक श्री. विकास देसाई, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजनकार श्री. प्रवीण साळुंखे, 'म्हाडा'चे सचिव श्री. राजकुमार सागर, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्रीमती वैशाली गडपाले आदींसह म्हाडातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे प्रधान कार्यवाह श्री. एस. के. भंडारे यांनी केले.
    या कार्यक्रमावेळी कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर शासनाने आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करण्यात आले, तसेच या कार्यक्रमात सुरक्षित अंतराचे पालन व्हावे, म्हणून 'म्हाडा'तील विविध विभागांमध्ये अधिकारी-कर्मचारी यांनी मुख्य कार्यक्रम स्थळी न येता त्यांच्या कार्यालयातच संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले.
    या प्रसंगी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी-कर्मचारी, सैन्य दलातील वीर जवान यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून म्हाडातील अधिकारी-कर्मचारी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.    

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे (Preamble) सामुहिक वाचन करताना 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल डिग्गीकर. समवेत मुख्य अभियंता-१ श्री. धीरजकुमार पंदिरकर, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी श्री.अरुण डोंगरे, मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. योगेश म्हसे, वित्त नियंत्रक श्री. विकास देसाई, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ श्री.प्रवीण साळुंखे, म्हाडाचे सचिव श्री. राजकुमार सागर, मुख्य जनसंपर्क अधिकारी श्रीमती वैशाली गडपाले, म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे प्रधान कार्यवाह श्री. एस. के. भंडारे आदी.