Tuesday 28 August 2018

म्हाडाच्या मुंबईतील ५६ वसाहतीतील गाळेधारकांची अभिहस्तांतरण प्रक्रिया होणार वेगवान-सुलभ    

सेवा अधिमूल्याच्या भरणेनंतर वाढीव सेवा आकारावरील व्याजाच्या रकमेच्या अदायगीस एक वर्षाची मुदत 

मुंबई, दि. २८ ऑगस्ट, २०१८ :- मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडाचा घटक) अखत्यारीतील मुंबईमधील ५६ वसाहतीतील गाळेधारकांची अभिहस्तांतरण प्रक्रियेस गती येण्याकरिता म्हाडातर्फे नवीन धोरण जाहीर करण्यात आले असून यानुसार इमारतीच्या मालकीचे सहकारी संस्थेकडे हस्तांतरण करतेवेळी संस्थेकडे १९९८ पूर्वीच्या सेवाआकाराच्या दाराची रक्कम दंडासह व सुधारित सेवा आकाराच्या दरातील मूळ रक्कम वसूल करुन सुधारित सेवा आकारावरील व्याजाची रक्कम एक वर्षात म्हाडाकडे भरण्याबाबत संस्थांकडून क्षतिपूर्ती बंधपत्र घेऊन ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करवून घेऊन अभिहस्तांतरण करता येईल , अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलिंद म्हैसकर यांनी जाहीर केलेल्या सुधारित परीपत्रकाद्वारे दिली आहे.   
       मिळकत व्यवस्थापक विनियम २१ मधील तरतुदीनुसार अभिहस्तांतरण झाल्यानंतर सेवा आकार व इतर देय रकमा संबंधित संस्थेकडे जसे बृहन्मुंबई महानगरपालिका, विदुयत मंडळाकडे परस्पर भरण्याची जबाबदारी संस्थेची राहील. तसेच अनधिकृत बांधकामांच्या अभिहस्तांतरणाबाबत म्हाडाच्या मूळ नकाशात दर्शविलेले क्षेत्रफळ ग्राह्य धरून अभिहस्तांतरण करता येईल व वाढीव बांधकामाबाबत स्वतंत्ररित्या कारवाई करण्यात येईल, असा निर्णय या परिपत्रकाद्वारे घेण्यात आला आहे. 
       अभिहस्तांतरण हे संस्थेच्या नावाने करावयाचे असते म्हणून म्हाडाचे मूळ गाळेधारक आणि म्हाडाकडून रीतसर परवानगी घेतलेले गाळेधारक यांच्या यादीनुसार संस्थेबरोबर अभिहस्तांतरण करण्यात येईल व संबंधित गृहनिर्माण संस्थेकडून सदरच्या गाळेधारकाच्या हस्तांतरणास, अभिहस्तांतरण झाल्यानंतर विहीत कार्यपद्धतीनुसार कागदपत्रांची पूर्तता व हस्तांतरण शुल्क भरून म्हाडाकडून परवानगी घेण्यात येईल असे प्रतिज्ञापत्र घेऊनच त्या गृहनिर्माण संस्थेचे अभिहस्तांतरण करण्यात येईल, अशी तरतूद या परिपत्रकात करण्यात अली आहे .  
         या नवीन धोरणामुळे  गाळेधारक व सहकारी गृहनिर्माण संस्थांना अभिहस्तांतरण करतेवेळी येणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होईल व ही कार्यपद्धत अधिक सोपी, सुलभ, गतिमान होऊन अभिहस्तांतरणाला निश्चितच वेग मिळेल. मुंबई मंडळाच्या अखत्यारीतील ५६ वसाहतीतील ३७०१ इमारतीत १,११,६५९ सदनिकाधारकांपैकी १,७३७ इमारती ४५,१६१ गाळेधारकांचे अभिहस्तांतरण झालेले असून, १,९६४ इमारतीतील ६६,४९८ गाळेधारकांचे अभिहस्तांतरण व्हावयाचे आहे. 

      

Thursday 23 August 2018

म्हाडा सदनिका सोडत - २०१८

कोंकण मंडळाच्या ९०१८ सदनिकांसाठी ५५३२४ अर्ज प्राप्त

२५ ऑगस्ट रोजी सोडत ; अर्जदारांच्या सोयीसाठी वेबकास्टिंगद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण       


मुंबई, दि. २३ ऑगस्ट, २०१८ :- म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ९०१८  परवडणाऱ्या सदनिकांच्या विक्रमी ऑनलाईन सोडतीकरीता ५५,३२४ अर्जांचा यशस्वी प्रतिसाद मिळाला असून या अर्जदारांना सदनिका वितरणाकरिता शनिवार, दि. २५ ऑगस्ट, २०१८ रोजी वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात सकाळी १० वाजता संगणकिय सॊडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विजय लहाने यांनी आज दिली.  
       माननीय गृहनिर्माण मंत्री श्री. प्रकाश महेता यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणारी ही सोडत मुंबई उपनगरचे माननीय पालकमंत्री तथा राज्याचे शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून  माननीय गृहनिर्माण राज्यमंत्री श्री. रविंद्र वायकर, माननीय खासदार श्रीमती पूनम महाजन, माननीय आमदार श्रीमती तृप्ती सावंत, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. संजय कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिलिंद म्हैसकर उपस्थित राहणार आहेत.
      या सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगद्वारे करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच आपला निकाल जाणून घेता येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही  "वेबकास्टिंग" तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण http://mhada.ucast.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच म्हाडा मुख्यालयाच्या आवारातील मोकळ्या पटांगणात अर्जदारांना निकाल पाहता येण्यासाठी मंडप उभारण्यात येणार असून भवनात होणाऱ्या संगणकीय सोडतीचे थेट प्रक्षेपण पाहता यावे याकरिता एलईडी स्क्रीन देखील लावण्यात येणार आहेत. 
       यंदाच्या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी मीरा रोड, बाळकूम ठाणे, मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील ५१८ सदनिका व प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत  शिरढोण (ता. कल्याण), खोणी (ता. कल्याण) येथील ३९३७ अशा एकूण ४,४५५ सदनिकांचा समावेश आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता मीरा रोड, कावेसर ठाणे, वेंगुर्ला सिंधुदुर्ग, विरार बोळींज, खोणी (ता. कल्याण), मौजे अंतर्ली, खोणी हेदुटने, कोले (ता. कल्याण), मौजे उंबार्ली (ता. अंबरनाथ) येथील ४३४१ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता बाळकूम (ठाणे), वेंगुर्ला (सिंधुदुर्ग),  मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी), विरार बोळींज येथील एकूण २१५ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता वेंगुर्ला (सिंधुदुर्ग),  मीरा रोड, कुंवर बाव (रत्नागिरी) येथील एकूण ७ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.              
       मंडळातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे या सोडतीमध्ये यशस्वी अर्जदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी म्हाडा मुख्यालयात दि. २७ ऑगस्ट २०१८ ते ०१ सप्टेंबर २०१८ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत विशेष मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत असलेल्या   योजना संकेत क्रमांकामधील २७०, २७१, २७२ व २७५ विजेत्यांनी कागदपत्रांसह हजर रहावे, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे. 
     सोडतीमधील विजेत्या तसेच प्रतिक्षाधीन अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in  या वेबसाईटवर दि. २५ ऑगस्ट, २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे, याची संबंधित अर्जदारांनी नोंद घ्यावी. 

Tuesday 7 August 2018

कोंकण मंडळाच्या सदनिका  सोडतीला मुदतवाढ      

२५ ऑगस्ट रोजी संगणकीय सोडत ; ऑनलाईन अनामत रक्कम भरण्यासाठी १८ ऑगस्टपर्यंत अंतिम मुदत          

मुंबई, दि. ०७ ऑगस्ट, २०१८ :-  कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे  (म्हाडाचा घटक ) नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या ९०१८ सदनिकांच्या विक्रमी सोडतीकरिता लोकाग्रहास्तव आठ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून नागरिक दि. १८ ऑगस्ट, २०१८ पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. शनिवार, दि. २५ ऑगस्ट, २०१८ रोजी वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या म्हाडाच्या मुख्यालयात सकाळी १० वाजता संगणकिय सॊडत काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. विजय लहाने यांनी आज दिली.                                    
    नवीन वेळापत्रकानुसार अर्जदार दि. १६ ऑगस्ट, २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत  नोंदणी करू शकतात . नोंदणीकृत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता अंतिम मुदत दि. १८ ऑगस्ट ,२०१८ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे. तसेच  ऑनलाईन अनामत रक्कम  भरण्याची अंतिम मुदत दि. १८ ऑगस्ट, २०१८ रोजी रात्री ११. ५९ वाजेपर्यंत असणार आहे.  अनामत रक्कम एनईएफटी व आरटीजीएसद्वारे भरण्याकरिता चलन निर्मिती दि. १६ ऑगस्ट ,२०१८ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केली जाऊ शकते. तसेच अर्जदार दि. १८ ऑगस्ट, पर्यंत चलन बँकेत सादर करू शकतात. कोंकण मंडळातर्फे दि . १७ जुलै, २०१८ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर अर्ज भरण्याकरिता नागरिकांना केवळ २४ दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. करिता म्हाडा कार्यालयात दूरध्वनी वरून नागरिकांनी केलेल्या मागण्यांनुसार सदरील मुदतवाढीचा निर्णय म्हाडा प्रशासनाने  घेतला आहे.      
      मंडळातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे या सोडतीमध्ये यशस्वी अर्जदारांची पात्रता निश्चित करण्यासाठी म्हाडा मुख्यालयात दि. २७ ऑगस्ट २०१८ ते ०१ सप्टेंबर २०१८ या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत विशेष शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात प्रधान मंत्री आवास योजनेअंतर्गत असलेले योजना संकेत क्रमांकामधील २७०, २७१, २७२ व २७५ विजेत्यांनी कागदपत्रांसह हजर रहावे, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे. 
     सोडतीसाठी स्विकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी म्हाडाच्या https://lottery.mhada.gov.in  या वेबसाईटवर दि. २२ ऑगस्ट, २०१८ रोजी सायंकाळी ६.०० वाजता केली जाणार असून सोडतीसाठी स्विकृत अर्जांची अंतिम यादी  दि. २३ ऑगस्ट, २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्ध करण्यात येणार आहे.