Wednesday, 20 June 2018

म्हाडा पुणे मंडळाच्या ३१३९ सदनिका, २९ भूखंडांच्या सोडतीसाठी

सुमारे ३४,२१२ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त

४३ हजार ५२० अर्जदारांनी अर्ज भरले ; अनामत रकमेसह प्राप्त अर्जांचा आकडा वाढण्याची शक्यता  

मुंबई, दि. २० जून २०१८ :- पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडाचा विभागीय घटक) अखत्यारीतील विविध गृह प्रकल्पांतर्गत ३१३९ सदनिका व २९ भूखंड विक्री सोडतीसाठी ४३,५२०  अर्जदारांनी अर्ज भरले असून त्यापैकी सुमारे ३४,२१२ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत.
       दि. २०/०६/२०१८ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड , इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम स्विकारली जाणार असून अनामत रकमेसह प्राप्त अर्जांच्या अंतिम आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. आय. टी. इनक्युबेशन सेंटर, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे येथे दि. ३० जून २०१८ रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे.  
       सदर सोडतीत सहभागी होण्याकरिता अर्जदारांना नोंदणीसाठी दि. १८ जूनपर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत ३८ हजार ३१० अर्जदारांनी नोंदणी केली. नोंदणीकृत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. १९ जून २०१८ रोजी रात्री १२ वाजेपर्यंतची अंतिम मुदत आता संपली  आहे.  अर्जदारांच्या सोयीसाठी पुणे मंडळातर्फे यंदा प्रथमच  NEFT / RTGS  द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. 
       यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी सेक्टर ५ ए-ब, नांदेड सिटी (सिंहगड रोड, नांदेड गाव, पुणे) व महाळुंगे टप्पा-१ (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) येथील एकूण ४४९ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता  महाळुंगे टप्पा-२ (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) गोपाळपूर (ता. पंढरपूर, जि. सोलापूर), मोरेवाडी (कोल्हापूर), बार्शी (जि. सोलापूर), विजापूर रोड (जि. सोलापूर), तळेगांव दाभाडे (पुणे), सदर बाजार (सातारा), सासवड(ता. पुरंदर, जि. पुणे), दिवे (ता. पुरंदर, जि. पुणे), हडपसर (पुणे), रावेत (पुणे), नांदेड सिटी (सिंहगड रोड, नांदेड गाव, पुणे), चिखली -मोशी (पुणे), पिंपरी (पुणे), चिखली, चऱ्होली बु., कात्रज, धानोरी, आळंदी रोड, वाकड, येवलेवाडी (ता. हवेली, जि. पुणे),मौजे वडमुखवाडी, शिवाजी नगर (सोलापूर), डुडुळगाव  येथील २४०४ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता  सुभाष नगर (कोल्हापूर), सासवड, खराडी, शिवाजीनगर (जि. सोलापूर), विजापूर रोड (जि. सोलापूर), पिंपरी, महाळुंगे टप्पा-१ (चाकण-तळेगाव रोड, चाकण एमआयडीसीसमोर, ता. खेड, जि. पुणे) येथील एकूण २८२ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. तर उच्च उत्पन्न गटाकरिता पिंपरी (पुणे) येथील एकूण ४ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे.
     अल्प उत्पन्न गटाकरिता क्षेत्र माहुली (जि. सातारा) बार्शी (जि. सोलापूर), भोर (जि. पुणे), दहिवडी (ता. माण, जि. सातारा), बनवडी (ता. कराड, जि. सातारा), शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा), अक्कलकोट (जि. सोलापूर),  वाठार निंबाळकर (ता. फलटण, जि. सातारा) येथील भूखंडांचा सोडतीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता  बार्शी (जि. सोलापूर), क्षेत्र माहुली (जि. सातारा), दहिवडी (ता. माण, जि. सातारा) तर  उच्च  उत्पन्न गटाकरिता  वाठार निंबाळकर (ता. फलटण, जि. सातारा)  येथील भूखंडांचा सोडतीत समावेश आहे.                   
     सदनिकांच्या वितरणासाठी कोणालाही म्हाडाने प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजन्ट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये. तसे केल्यास पुणे मंडळ / म्हाडा कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही.

Tuesday, 19 June 2018

म्हाडातील इमारत प्रस्ताव परवानगी विभागाकडे ६० प्रस्ताव

परवडणाऱ्या सदनिकांच्या निर्मितीला वेग

मुंबई, दि. १९ जुन २०१८ :-  महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा)  नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर 'म्हाडा'कडे आत्तापर्यंत  इमारत परवानगी, सुधारित नकाशे मंजुरी, भोगवटा प्रमाणपत्र इत्यादी मिळण्यासाठी सुमारे ६० प्रस्ताव प्राप्त झाले असून म्हाडाच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास जलदगतीने होऊन तेथील रहिवाशांच्या पुनर्वसनाबरोबर मोठ्या प्रमाणात सदनिका उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
        राज्य शासनाने दि. २३ मे २०१८ रोजी अधिसूचना काढून 'म्हाडा'ला नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर, म्हाडाच्या जुन्या वसाहतीतील इमारतींच्या पुनर्विकास प्रस्तावांना चालना देण्याकरिता म्हाडा मुख्यालयात अभिन्यास मंजुरी (Layout Approval) कक्ष, बृहन्मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव परवानगी (Building permissions) कक्ष व प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत येणारे इमारत प्रस्ताव परवानगी या कामांसाठी तीन स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. बृहन्मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव परवानगी (Building permissions) कक्षामार्फत नेहरू नगर, कुर्ला येथील त्रिमूर्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेला नुकतेच भोगवटा प्रमाणपत्र तसेच सहा इमारतींच्या विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे व उर्वरित प्रस्तावांची कार्यवाही प्रगती पथावर आहे. या कक्षांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या परवानग्या ऑनलाईन पद्धतीने मिळाव्यात या करीता बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंगीकृत केलेली संगणकीय  आज्ञावली पालिकेच्या परवानगीने जशीच्या तशी म्हाडा कार्यालयातील सदरील कक्षांमध्ये वापरण्यात येणार आहे. या कक्षांमधील कामकाज सुलभ व सुरळीतरित्या पार पाडण्याकरिता बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अनुभवी अभियंत्यांची याकामी मदत घेण्यात येणार आहे. 
         म्हाडाच्या बृहन्मुंबई क्षेत्रामधील ११४ अभिन्यासाची जमीन म्हाडाची, व त्यावर नियोजन प्राधिकरणाचे अधिकार म्हाडास प्राप्त झाल्यामुळे पुनर्विकासास व परवडणाऱ्या दरातील सदनिकांच्या निर्मितीला वेग येणार असून भविष्यात सुमारे सहा लाख सदनिका उपलब्ध होण्याची शक्यता आहे. बृहन्मुंबई क्षेत्र इमारत प्रस्ताव परवानगी कक्षातील कामकाजासाठी विकास नियंत्रण नियमावली व एमआरटीपी कायद्यातील तरतुदीनुसार करण्यात येत आहे.

Wednesday, 13 June 2018

म्हाडा पुणे मंडळाच्या सदनिका, भूखंड सोडतीकरिता अर्ज नोंदणी १८ जुनपर्यंत

सोडतीकरिता अद्यापपर्यंत सुमारे २० हजार अर्जदारांची नोंदणी  

मुंबई, दि. १३ जुन २०१८ :- पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडाचा विभागीय घटक) अखत्यारीतील विविध गृह प्रकल्पांतर्गत ३१३९ सदनिका व २९ भूखंड विक्री सोडतीमध्ये  अद्यापपर्यंत सुमारे २० हजार अर्जदारांनी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे १० हजार अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. सदर सोडतीत सहभागी होण्याकरिता अर्जदारांना दि. १८ जून २०१८ रात्री ११.५९ वाजेपर्यंत नोंदणी करता येणार असून नोंदणीकृत अर्जदारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. १९ जून २०१८ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत अंतिम मुदत असणार आहे.
       आय. टी. इनक्युबेशन सेंटर, नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे येथे दि. ३० जून २०१८ रोजी सकाळी दहा वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. अर्जदारांच्या सोयीसाठी पुणे मंडळातर्फे यंदा प्रथमच  NEFT / RTGS  द्वारे अनामत रक्कम भरण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असून  याद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी दि. १९/०६/२०१८ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अनामत रक्कम भरता येणार आहे. तसेच डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड , इंटरनेट बँकिंगद्वारे अनामत रक्कम दि. २०/०६/२०१८ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत स्वीकारली जाणार आहे.
     सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम व उच्च उत्पन्न गटाकरिताच्या सदनिकांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटाकरिता दि. ०१/०४/२०१७ ते ३१/०३/२०१८ या कालावधीमध्ये असलेले अर्जदाराचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न (पती + पत्नी यांचे एकत्रित उत्पन्न) रु. २५,०००/ पर्यंत असावे. अल्प उत्पन्न गटाकरिता रु. २५,००१ ते रु. ५०,००० पर्यंत व मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. ५०,००१ ते रु. ७५,००० पर्यंत तर उच्च उत्पन्न गटाकरिता अर्जदाराचे रु. ७५,००१ वा त्यापेक्षा जास्त सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कम (परतावा) + अर्ज शुल्क (विना परतावा) अत्यल्प उत्पन्न गटाकरिता रु. ५,४४८/- प्रति अर्ज, अल्प उत्पन्न गटाकरिता रु. १०,४४८ प्रति अर्ज, मध्यम उत्पन्न गटाकरिता रु. १५,४४८ प्रति अर्ज,  उच्च उत्पन्न  गटाकरिता रु. २०,४४८ प्रति अर्ज आकारली जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन अर्जापोटी प्रतिअर्ज  रु. ४४८ (विना परतावा) अर्ज शुल्काचा समावेश आहे. सोडतीची विस्तृत माहिती https://lottery.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत  संकेतस्थळावर उपलब्ध आहे.   