Friday, 4 August 2017

एमएमआरडीए -१ / २०१६ च्या मौजे कोन येथील सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार / वारस यांना कोटक महिंद्रा बँकेत कागदपत्रे सादर करण्यासाठी २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई, दि. ०४ ऑगस्ट :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ला भाडेतत्वावरील गृहनिर्माण योजनेद्वारे मौजे  कोन (ता. पनवेल, जि. रायगड) येथील प्राप्त २४१७ सदनिकांची मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत संगणकीय सोडत दि. ०२/१२/२०१६ रोजी काढण्यात आली. सदर सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या गिरणी कामगार / वारस यांना कोटक महिंद्रा बँकेत कागदपत्रे सादर करण्यासाठी दि. ०४/०८/२०१७ पर्यंत देण्यात आलेली मुदत दि. २२/०९/२०१७ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सुभाष लाखे यांनी दिली.
दि. ०२/१२/२०१६ रोजी काढण्यात आलेल्या सदर सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या गिरणी कामगार / वारस यांची यादी म्हाडाचे संकेतस्थळ https://mhada.maharashtra.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशा यशस्वी ठरलेल्या गिरणी कामगार / वारस यांना उपमुख्य अधिकारी (पूर्व), मुंबई मंडळ (म्हाडा) या कार्यालयामार्फत त्यांच्या अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर प्रथम सूचना पत्रे पाठविण्यात आली. सदर प्रथम सूचना पत्रानुसार यशस्वी ठरलेल्या गिरणी कामगार / वारस यांना कोटक महिंद्रा बँकेत कागदपत्रे सादर करण्यासाठी दि. ०५/०७/२०१७ ते दि. ०४/०८/२०१७ पर्यंत मुदत देण्यात आली होती. परंतु, सदर मुदतीत बऱ्याच गिरणी कामगार / वारस यांनी बँकेत कागदपत्रे सादर केलेली नसल्यामुळे त्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी दि. २२/०९/२०१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर मुदतीत गिरणी कामगार / वारस यांनी उपरोक्त उल्लेखित बँकेत कागदपत्रे सादर न केल्यास त्यांच्याऐवजी प्रतीक्षा यादीवरील गिरणी कामगार / गिरणी कामगारांचे वारस यांना संधी देण्यात येईल. याबाबत मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ जबाबदार राहणार नाही. मुंबई मंडळ / म्हाडा / एमएमआरडीए यांनी सदनिकांच्या वितरणासाठी किंवा याबाबतच्या कोणत्याही कामासाठी, कोणालाही प्रतिनिधी / सल्लागार / एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ व्यक्तींशी सदनिकेबाबत कोणताही परस्पर व्यवहार केल्यास त्याला मुंबई मंडळ / म्हाडा / एमएमआरडीए जबाबदार राहणार नाही. कृपया याची सर्व संबंधित गिरणी कामगार / वारस यांनी नोंद घ्यावी.