Friday, 28 October 2016

झोपडीतून थेट ३०० चौरस फुटाच्या सदनिकेत    

दिवाळीच्या मुहूर्तावर ६५ धारावीवासीयांचा गृहप्रवेश 

धारावी सेक्टर - ५ पुनर्विकास प्रकल्प ; म्हाडाने पात्र झोपडीधारकांना दिला पथदर्शी इमारतीतील  सदनिकांचा ताबा      

 
मुंबई , दि. २८ ऑक्टोबर २०१६ :- मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण {म्हाडा} चा घटक) धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ मध्ये उभारण्यात आलेल्या १८ मजली पथदर्शी इमारतीत धारावीतील क्लस्टर जे मधील ६५  निवासी पात्र झोपडीधारकांना आज दिवाळीच्या मुहूर्तावर सदनिकांचा ताबा देण्यात आला.
वर्षानुवर्षे झोपडीत राहत असलेल्या या झोपडीधारकांना व त्यांच्या कुटुंबियांना आज थेट ३०० चौरस फुट चटई क्षेत्रफळाच्या अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त सदनिकेचा ताबा मिळाल्यानंतर गृहस्वप्नपूर्तीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासणाऱ्या "म्हाडा" ने या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवनमान  उंचावण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य, कौतुकास्पद, स्मरणीय असल्याची भावना यावेळी  लाभार्थ्यांनी व्यक्त केली.          
"म्हाडा"तर्फे धारावीत उभारण्यात आलेल्या पथदर्शी इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सुभाष लाखे, सहमुख्य अधिकारी श्री. चंद्रकांत डांगे, कार्यकारी अभियंता श्री. एन. एन. चांदेरे आदींच्या हस्ते पात्र लाभार्थ्यांना सदनिकेची चावी व ताबा पत्राचे वाटप करण्यात आले.      
सदर इमारतीत ३०० चौरस फुटाच्या (कार्पेट) ३५८ सदनिका आहेत. मे- २०१६ मध्ये २६६ पात्र निवासी झोपडीधारकांना  पुनर्वसन सदनिकेचा ताबा देण्यात आला आहे. दि. १८ ऑक्टोबर २०१६ रोजी क्लस्टर जे मधील ६५ निवासी पात्र झोपडीधारकांना चिट्ठी पद्धतीने सोडत काढून सदनिकांचे वितरणपत्र देण्याबरोबरच पात्र झोपडीधारकांना इमारतीतील कुठल्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका द्यावी, याबाबतचा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपमुख्य अधिकारी श्री. के. व्ही. वळवी, उपमुख्य अधिकारी श्री. टी. पी. राठोड, उपमुख्य अधिकारी श्रीमती  विराज श्रीमती  विराज मढवी, जनसंपर्क अधिकारी श्री. हेमंत पाटील उपस्थित होते. उपसमाज विकास अधिकारी श्री. यु. एस. भिसे यांनी सूत्रसंचालन केले.
---
लाभार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावना

घराचे स्वप्न अखेर पूर्ण  
कोल्हापूर जिल्ह्यातील भीमा कोरेगाव हे आमचे मूळ गाव. २५ वर्षांपूर्वी रोजगारानिमित्त पतीसमवेत मुंबईला आलो. धारावीतील दहा बाय बाराच्या झोपडीत निवारा शोधला. अनेक वर्ष खडतर जीवन जगल्यानंतर आज मोठ्या, व सर्वसुविधांनी युक्त पक्क्या घरात आलो आहोत. घराचे स्वप्न अखेर पूर्ण झाले. म्हाडाचे आभार.    
- श्रीमती शालन रतन गाडेकर                                  
----

चावी भेटली आता खात्री पटली  
माझा जन्म मुंबईचा.. धारावीत सुमारे २२ वर्षांपासून वास्तव्यास आहे. माझे पती,  मुलगा, मुलगी असे कुटुंब असून रोजगारासाठी एका क्लिनिकमध्ये साफसफाईचे तसेच धुणी भांडीचे कामही करते. महिन्याला सुमारे ५ हजार रुपये पोटापाण्यापुरता मिळतात. अशा परिस्थितीत घराचे स्वप्न दुरापास्त होते. मात्र, म्हाडातर्फे तुम्हाला घर मिळणार असे अनेक दिवसांपासून ऐकत होते. आज हातात चावी मिळाली प्रत्यक्ष घरात आले आणि खात्री पटली. खूप खूप आनंद झाला.                              
- श्रीमती मंगला मारुती पवार

मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ मध्ये उभारण्यात आलेल्या पथदर्शी इमारतीतील सदनिकेचे ताबा पत्र व चावी श्रीमती मंगला मारुती पवार यांना देतांना मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सुभाष लाखे. समवेत  सहमुख्य अधिकारी श्री. चंद्रकांत डांगे, कार्यकारी अभियंता श्री. एन. एन. चांदेरे, उपमुख्य अधिकारी श्री. के. व्ही. वळवी आदी.




मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ मध्ये उभारण्यात आलेल्या पथदर्शी इमारतीतील  सदनिकेचे ताबा पत्र व चावी श्री. गणपत हरी डावळ     यांना देतांना मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. सुभाष लाखे. समवेत  सहमुख्य अधिकारी श्री. चंद्रकांत डांगे, कार्यकारी अभियंता श्री. एन. एन. चांदेरे, उपमुख्य अधिकारी श्री. टी. पी. राठोड आदी. 

Wednesday, 26 October 2016

म्हाडाची ६५ धारावीवासीयांना दिवाळी भेट

धारावी सेक्टर - ५ पुनर्विकास प्रकल्पातील पथदर्शी इमारतीत शुक्रवारी देणार सदनिकांचा ताबा  

मुंबई , दि. २६ ऑक्टोबर २०१६ :- मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण {म्हाडा} चा घटक) धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ चा पुनर्विकास केला जात आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत "म्हाडा"तर्फे धारावीत उभारण्यात आलेल्या १८ मजली पथदर्शी इमारतीत क्लस्टर जे मधील ६५ निवासी पात्र झोपडीधारकांना दिवाळीच्या मुहूर्तावर शुक्रवार, दि. २८ ऑक्टोबर २०१६ रोजी सकाळी अकरा वाजता  सदनिकांचा ताबा दिला जाणार आहे.
"म्हाडा"तर्फे धारावीत उभारण्यात आलेल्या पथदर्शी इमारतीच्या प्रांगणात  हा कार्यक्रम होणार आहे.  सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासणारी "म्हाडा" सर्वसामान्य नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावण्याकरिता सतत प्रयत्नशील आहे. या माध्यमातून पात्र झोपडीधारकांना दिवाळीच्या मुहूर्तावर हक्काच्या घरात प्रवेश देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न म्हाडातर्फे केला जाणार आहे. दि. १८ ऑक्टोबर २०१६ रोजी क्लस्टर जे मधील ६५ निवासी पात्र झोपडीधारकांना चिट्ठी पद्धतीने सोडत काढून सदनिकांचे वितरणपत्र देण्याबरोबरच पात्र झोपडीधारकांना इमारतीतील कुठल्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका द्यावी, याबाबतचा निर्णय घेण्यात आला.  सदर इमारतीत ३०० चौरस फुटाच्या (कार्पेट) ३५८ सदनिका आहेत. मे- २०१६ मध्ये २६६ पात्र निवासी झोपडीधारकांना  पुनर्वसन सदनिकेचा ताबा देण्यात आला. 

Tuesday, 18 October 2016

धारावी सेक्टर - ५ पुनर्विकास प्रकल्प
६७ झोपडीधारकांना सदनिकांचे वितरणपत्र
मुंबई , दि. १८ ऑक्टोबर २०१६ :- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) चा घटक असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सेक्टर-५ चा पुनर्विकास केला जात आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत "म्हाडा"तर्फे धारावीत उभारण्यात आलेल्या १८ मजली पथदर्शी इमारतीत क्लस्टर जे मधील ६७ निवासी पात्र झोपडीधारकांना आज चिट्ठी पद्धतीने सोडत काढून सदनिकांचे वितरणपत्र देण्यात आले.
"म्हाडा"तर्फे धारावीत उभारण्यात आलेल्या १८ मजली पथदर्शी इमारतीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सहमुख्य अधिकारी श्री. चंद्रकांत डांगे, उपमुख्य अधिकारी श्री. के. व्ही. वळवी, उपमुख्य अधिकारी श्री. टी. पी. राठोड, उपमुख्य अधिकारी श्रीमती विराज मढवी, सहकार अधिकारी श्री. जाधव आदी उपस्थित होते.
पात्र झोपडीधारकांना इमारतीतील कुठल्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका द्यावी, याबाबतचा निर्णय आज झाला. ६७ पात्र झोपडीधारकांना कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर सदनिकेचा ताबा दिला जाणार आहे. सदर इमारतीत ३०० चौरस फुटाच्या (कार्पेट) ३५८ सदनिका आहेत. क्लस्टर जे मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शताब्दी नगर या वसाहतीतील झोपडीधारकांची पात्र-अपात्र बाबतची प्रक्रिया राबविल्यानंतर मे- २०१६ मध्ये २६६ पात्र निवासी झोपडीधारकांना पुनर्वसन सदनिकेचा ताबा देण्यात आला आहे.

Thursday, 6 October 2016

दिनांक ३ ऑकटोबर २०१६ रोजी ' जागतिक निवारा दिन ' यानिमित्तानं निवारा दिनाचं महत्त्वं, जागतिक संदर्भात भारतातली आणि महाराष्ट्रातली निवाऱ्याची स्थिती, तसंच महानगरी मुंबापूरीतलं चित्र आणि त्यातील सरकारचा सहभाग, आदी मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात 'म्हाडा'चे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संभाजी झेंडे (भा. प्र. से.)  दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील साडेनऊच्या बातमीपत्रात सहभागी झाले.

Wednesday, 5 October 2016

म्हाडा पुणे मंडळाच्या सदनिका सोडतीकरिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ 


म्हाडा पुणे मंडळाच्या सदनिका सोडतीकरिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ 

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळातर्फे २५०३ सदनिका व ६७ भूखंडाच्या सोडतीकरिता अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी https://mhada.maharashtra.gov.in  किंवा https://lottery.mhada.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्या.